पूर पीडितांच्या मदतीसाठी सैनिक धावले; विदर्भातील शेकडो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2022 09:24 PM2022-07-20T21:24:34+5:302022-07-20T21:25:01+5:30
Nagpur News मुसळधार पावसामुळे विदर्भातील अनेक गावे पाण्याखाली आली आहेत. अशा गावांतील नागरिकांच्या मदतीसाठी सैनिक धावून गेले. त्यांनी शेकडो नागरिकांना पुराच्या संकटातून बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलविले.
नागपूर : भारतीय नागरिकांवर आलेले संकट परतवून लावण्यासाठी तिन्ही सुरक्षा दलाचे सैनिक नेहमीच पुढे असतात. त्याची प्रचिती सध्याच्या अस्मानी संकटाच्या वेळीही आली. मुसळधार पावसामुळे विदर्भातील अनेक गावे पाण्याखाली आली आहेत. अशा गावांतील नागरिकांच्या मदतीसाठी सैनिक धावून गेले. त्यांनी शेकडो नागरिकांना पुराच्या संकटातून बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलविले.
विदर्भामध्ये पाऊस गेल्या आठ दिवसापासून थैमान घालत आहे. धरणे पाण्याने भरली आहेत. धरणातील अतिरिक्त पाणी नद्यांमध्ये सोडले जात आहे. याशिवाय पाऊसही सलग सुरू आहे. परिणामी, सर्वच नद्यांना पूर आला आहे. नद्यांजवळची गावे पाण्याखाली आली आहेत. सरकारी यंत्रणा या संकटातून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी आपल्या परीने संघर्ष करीत आहे. दरम्यान, सरकारने सैन्य दलांनाही मदतीकरिता आवाहन केले होते. सैन्य दलांनी सरकारला लगेच सकारात्मक प्रतिसाद दिला.
विदर्भामध्ये कामठी येथील गार्ड्स रेजिमेंटल सेंटरच्या सैनिकांना १९ जुलै रोजी रात्री आवश्यक उपकरणांसह मेजर भूवन शाह यांच्या नेतृत्वाखाली पूर प्रभावित क्षेत्रांत पाठविण्यात आले. त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील मानगाव येथून बचाव कार्याला सुरुवात केली. पुरामुळे या गावाचा संपर्क तुटला होता. गावातील ११३ नागरिकांना स्थानिक प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने सुखरुप बाहेर काढण्यात आले. ब्रिगेडियर दीपक शर्मा यांनी पूर प्रभावित क्षेत्राला भेट देऊन बचाव कार्याचा आढावा घेतला. दरम्यान, इतर ठिकाणी बचाव कार्यासाठी जाण्याकरिता कामठी येथे एक अतिरिक्त पथक सज्ज ठेवण्यात आले.