उपराजधानीतील ‘वॉरियर्स’ना सोल्जरचा सॅल्यूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 08:32 PM2020-04-13T20:32:47+5:302020-04-13T20:33:58+5:30
रविवारी दुपारी एका छोट्याशा सोल्जरने रुट मार्च करणाऱ्या वॉरियर्सना कडक ‘सॅल्यूट’ ठोकून त्यांचे अभिनंदन केले. नुसते अभिनंदन करूनच तो थांबला नाही तर त्यांना चहापाणी देऊन त्यांचे स्वागतही केले. हा प्रकार सर्वत्र कौतुकाचा विषय ठरला आहे.
नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भयावह कोरोनाविरुद्ध पोलीस दल निकराने झुंज देत आहे. नागरिकांना संसर्ग होऊ नये म्हणून पोलीस रखरखत्या उन्हात रुट मार्च काढून जागरण करीत आहेत. काही उपद्रवी मंडळी पोलिसांना सारखा मनस्ताप देत आहे, तर सामाजिक दायित्व जपणारी मंडळी मात्र त्यांचे स्वागत करून त्यांना वेगवेगळ्या प्रकारे प्रोत्साहितही करीत आहेत. रविवारी दुपारी एका छोट्याशा सोल्जरने रुट मार्च करणाऱ्या वॉरियर्सना कडक ‘सॅल्यूट’ ठोकून त्यांचे अभिनंदन केले. नुसते अभिनंदन करूनच तो थांबला नाही तर त्यांना चहापाणी देऊन त्यांचे स्वागतही केले. हा प्रकार सर्वत्र कौतुकाचा विषय ठरला आहे.
घटना अशी आहे, परिमंडळ-२ च्या पोलीस उपायुक्त विनीता साहू आपल्या क्षेत्रात रविवारी दिवसभर रुट मार्च करीत होत्या. वस्त्यावस्त्यांमध्ये त्या कोरोनापासून बचाव करण्याच्या नागरिकांना सूचना देत होत्या. सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास हा मार्च सदर भागात पोहोचला. रुट मार्च सुरू असताना अचानक आईच्या कडेवरून उतरलेला एक छोटुकला रस्त्यावर धावत आला. सैन्य दलाचा हिरवा गणवेश (वर्दी), कॅप घालून असलेला हा छोटा सोल्जर डीसीपी साहू यांच्या पुढ्यात आला आणि ‘जय हिंद’ म्हणून त्याने त्यांना कडक सॅल्यूटही ठोकला. एवढ्यावरच थांबेल तो सोल्जर कसला, त्याने नंतर आईच्या हातात चहाचे कप तसेच सेव भरून असलेली थाळी धरली. त्यांच्यासोबत बोबडा संवादही साधला. दोन - चार मिनिटाच्या या आदरातिथ्याने रुट मार्च करणारे सारेच भारावले. वस्तीतील नागरिकांनीही जोरदार टाळ्या वाजवून वॉरियर्स तसेच सोल्जरचे अभिनंदन केले. आम्हाला तुमचा गर्व आहे, अशा शब्दसुमनांनी स्वागत करून नागरिकांनी घोषणाबाजी केली. सदरमधील या प्रशंसनीय प्रकाराची माहिती कळताच लोकमत प्रतिनिधीने पोलीस उपायुक्त साहू यांच्याशी संपर्क साधला. या प्रसंगाची माहिती देताना त्या अतिशय भारावल्या होत्या. आपल्यासाठी हा प्रसंग अविस्मरणीय आहे.
या प्रसंगातून आपल्याला आयुष्यभर उर्मी मिळत राहील, असेही त्या म्हणाल्या.