घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया केंद्र फेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:08 AM2021-06-04T04:08:08+5:302021-06-04T04:08:08+5:30
खापा : खापा शहर स्वच्छ व सुंदर दिसण्याकरिता प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना आखण्यात आल्या. यासोबतच शहरातील ओला व सुका ...
खापा : खापा शहर स्वच्छ व सुंदर दिसण्याकरिता प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना आखण्यात आल्या. यासोबतच शहरातील ओला व सुका कचऱ्याचे विलगीकरण करून खतनिर्मितीसाठी घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया केंद्र स्थापन करण्यात आले. या कामाचे कंत्राट चंद्रपूर येथील स्वयंरोजगार संस्थेला देण्यात आले. या संस्थेने सुरुवातीला चार ते पाच महिने शहरातील कचरा संकलन करून त्यावर प्रक्रिया करण्याचे काम केले. मात्र काही दिवसापासून शहरातील गोळा केलेल्या घनकचऱ्यावर डम्पिंग यार्डवर कुठलीही प्रक्रिया होत नाही. येथे कधी कचरा जाळण्यात येतो तर कधी मोठ्या खड्ड्यात टाकण्यात येतो. शहरातील उर्वरित कचरा हा खापानजीक असलेल्या रेल्वे स्थानकाच्या मैदानात टाकण्यात येत असल्याचा आरोपही स्थानिक नगरसेवकांनी केला आहे. घनकचरा उघड्यावर फेकण्यात येत असल्याने गावाच्या बाहेर ढिगारे तयार होत आहेत. या ढिगाऱ्यावरील प्लास्टिक उडून नजीकच्या शेतात जमा होतात. यामुळे स्थानिक शेतकरी त्रस्त झाले आहेत. सदर कंत्राटदार नियमानुसार काम करीत नसल्याचे तक्रार नगरसेवकांनी मुख्याधिकारी व जिल्हाधिकारी यांना दिली असल्याची माहिती गटनेते शेषराव मासूरकर यांनी दिली.
---
या विषयावर चौकशी समिती नेमण्यात आली आहे. चौकशीचा अहवाल आल्यावरच पुढील कारवाई होईल.
- डॉ. ऋचा धाबर्डे.