नाविन्यपूर्ण संशोधनातूनच निघू शकतो समस्यांवर तोडगा; जि.प.च्या मुख्याधिकाऱ्यांचे युवकांना आवाहन
By जितेंद्र ढवळे | Published: April 21, 2023 02:49 PM2023-04-21T14:49:55+5:302023-04-21T14:54:07+5:30
जागतिक नाविन्यतादिनाच्या औचित्याने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्राच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन
नागपूर : आरोग्य, शिक्षण, ग्रामीण विकास, पायाभूत सुविधा आदी क्षेत्रात नाविन्यपूर्ण संशोधनाद्वारे समस्यांवर तोडगा काढण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी केले. जागतिक नाविन्यतादिनाच्या औचित्याने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्राच्यावतीने आयोजित कार्यक्रमात शर्मा बोलत होत्या.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. डोरले सभागृहात आयोजित या कार्यक्रमास कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त प्रभाकर हरडे, एल.आय.टी. संस्थेचे संचालक डॉ. आर. बी. मानकर, विद्यापीठाच्या आंतरविद्याशाखेचे प्रमुख डॉ. प्रशांत कडू आदी उपस्थित होते.
गेल्या दोन महिन्यांदरम्यान नागपूर विभागात नाविन्यता व उद्योजकता कार्यक्रमांतर्गत राबवायच्या हॅकेथॉन, कार्यशाळा, विविध स्पर्धा आणि जनजागृतीपर उपक्रमांचे कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. शर्मा म्हणाल्या, नागपूर विद्यापीठांतर्गत मोठ्या प्रमाणात महाविद्यालयांचा समावेश होतो. जिल्ह्यात शाळांची संख्याही मोठी आहे. या शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांमध्ये संशोधकवृत्तीही आहे. या प्रतिभेच्या जोरावर विद्यार्थी व युवकांनी समाजातील विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आर्टीफिशीयल इंटॅलीजन्सचा वापर करावा. तसेच ॲप व स्टार्टअप्स निर्मितीच्या माध्यमातून उपायात्मक संशोधन केल्यास विकासात मोठा हातभार लागेल. कौशल्य विकास विभागाच्यावतीने येत्या दोन महिन्यांदरम्यान नागपूर विभागात राबविण्यात येणाऱ्या नाविन्यता व उद्योजकतेच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होऊन या युवकांनी संधीचे सोने करावे, असेही शर्मा यांनी सांगितले.