वाहतूक समस्या सोडवा; अपघातमुक्त शहर’ ही संकल्पना राबवा - विजयलक्ष्मी बिदरी
By आनंद डेकाटे | Published: January 18, 2024 07:52 PM2024-01-18T19:52:00+5:302024-01-18T19:52:21+5:30
वाहतूक पोलीस, महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने संयुक्तपणे अंमलबजावणी करा
नागपूर : नागपूर शहरातील वाहतुकीच्या नियमांसदर्भात नागरिकांमध्ये जागृकता निर्माण करून अपघात टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करा, वाहतुकीची समस्या सोडवा तसेच ‘अपघातमुक्त शहर’ ही संकल्पना राबविण्याला प्राधान्य द्या, अशा सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिल्यात. शहरातील पार्कींगच्या प्रश्नासंदर्भात वाहतूक पोलीस, महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागांनी संयुक्तपणे उपाययोजना अंमलात आणा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नागपूर शहरातील पार्किंगच्या प्रश्नावर उपाययोजना करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या. सहपोलीस आयुक्त अश्वती दोरजे, सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी, महानगरपालिका आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त आंचल सुद गोयल, अतिरिक्त जिल्हाधिकारी आशा पठाण, पोलीस उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.
शहरातील पार्कींग सुविधेसाठी निवड करण्यात आलेल्या ७५ रस्त्यांपैकी पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात १८ रस्त्यांचे सर्वेक्षण पूर्ण करून मार्कींग व फलक लावण्याचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम टप्याटप्याने न करता एकाचवेळी सर्व कामे करण्याचे नियोजन करा. अपघात प्रवण स्थळांची माहिती संबंधीत रस्त्यावर फलकाच्या माध्यमातून द्या. प्रत्येक झोनमध्ये विनाअडथळा वाहतुक सुरू राहील यादृष्टीने उत्कृष्ट कार्य करणाऱ्या तसेच अपघात विरहीत झोनला विशेष पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे. यासाठी वाहतूक सुरक्षेसंदर्भात दर तीन महिन्यांनी आढावा घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
३३ सीमेंट रस्त्यांची कामे २०२५ पूर्वी पूर्ण करणार, ३६१४ खड्डे बुजवले
मनपा आयुक्त अभिजीत चौधरी यांनी यावेळी सांगितले, शहरात स्मार्ट ट्राफीक सिग्नल लावण्यात येणार आहे. तसेच टप्पा चार अंतर्गत २३.४५ कि.मी. लांबीच्या एकूण ३३ सिमेंट रस्त्यांचे कामे २०२५ पूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले. याशिवाय एप्रिल ते डिसेंबर २०२३ या कालावधीत ६० हजार ९०४ चौ.मी. क्षेत्रफळाचे ३,६१४ खड्डे बुजविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. यासोबतच सहपोलीस आयुक्त अश्वती दोरजे यांनी शहर पोलीस वाहतूक शाखेचे आधुनिकीकरण करण्यासाठी विविध साहित्य खरेदीला मंजूरी देण्यात आल्याचे सांगितले.