नागपुरातील गड्डीगोदामचा काहीं परिसर सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 12:05 AM2020-05-17T00:05:02+5:302020-05-17T00:07:14+5:30
महापालिका हद्दीतील मंगळवारी झोन क्र. १० अंतर्गत येणाऱ्या गड्डीगोदाम प्रभाग क्रमांक ९ या भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरू नये व सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांची सुरक्षा लक्षात घेता काही परिसर सील करण्याचे आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शनिवारी दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिका हद्दीतील मंगळवारी झोन क्र. १० अंतर्गत येणाऱ्या गड्डीगोदाम प्रभाग क्रमांक ९ या भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरू नये व सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांची सुरक्षा लक्षात घेता काही परिसर सील करण्याचे आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शनिवारी दिले आहेत.
या आदेशानुसार प्रभाग क्रमांक ९ च्या दक्षिण पूर्वेस युवराज साखरे यांचे घर, दक्षिण- पश्चिमेस जयस्वाल रेशन शॉप, दक्षिण -पश्चिमेस किशोर शाहू यांचे घर, पश्चिमेस अन्नपूर्णा मंदिर, पश्चिमेस गड्डीगोदाम चौक, उत्तरेस गुरुद्वाराजवळील रेल्वे अंडर ब्रिज, पूर्वेस फेमस लायब्ररी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत. या भागात येणारे व जाणारे सर्व मार्ग तात्काळ बंद करून या भागाची सीमा आवागमनासाठी पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
सदर भागातील नागरिकांना प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर जाण्यास व सदर प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील नागरिकांना सदर क्षेत्रात येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
शासकीय व निमशासकीय सेवेतील अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी, आवश्यक तातडीची वैद्यकीय कारणे तसेच अंत्यविधी, वैद्यकीय सेवेशी संबंधित खासगी डॉक्टर, परिचारिका, मेडिकल स्टोअर्स दुकानदार, पॅथॉलॉजिस्ट, रुग्णवाहिका, पोलीस विभागामार्फत पासधारक असलेले जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे व्यक्ती यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.