कोणी मुलांच्या हितासाठी, तर कोणी प्रेमापोटी नव्याने थाटला संसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:09 AM2021-09-27T04:09:39+5:302021-09-27T04:09:39+5:30

नागपूर : पती-पत्नी एका रथाची दोन चाके असतात. ते एकमेकांसोबत ताळमेळ साधून चालल्यास संसार सुखाचा होतो, अन्यथा वादाची ठिणगी ...

Some for the benefit of children, some for the sake of love | कोणी मुलांच्या हितासाठी, तर कोणी प्रेमापोटी नव्याने थाटला संसार

कोणी मुलांच्या हितासाठी, तर कोणी प्रेमापोटी नव्याने थाटला संसार

Next

नागपूर : पती-पत्नी एका रथाची दोन चाके असतात. ते एकमेकांसोबत ताळमेळ साधून चालल्यास संसार सुखाचा होतो, अन्यथा वादाची ठिणगी पडून क्षणात होत्याचे नव्हते होते. वादाची कारणे बरेचदा क्षुल्लक असतात; पण अहंकार तडजोड होऊ देत नाही. काही दाम्पत्यांनी मात्र वेळीच स्वत:ला सावरले आणि वाद संपवून नव्याने सुखाचा संसार करण्याचा निर्धार केला. त्यापैकी कोणी मुलांच्या हितासाठी तर कोणी एकमेकांवरील प्रेमापोटी एकत्र आलेे.

कुटुंब न्यायालयामध्ये शनिवारी लोकन्यायालय आयोजित करण्यात आले होते. विविध कारणांमुळे विभक्त झालेल्या २० दाम्पत्यांनी तडजोड करण्यासाठी या लोकन्यायालयात हजेरी लावली होती. कायदेतज्ज्ञ व समुपदेशकांच्या मार्गदर्शनानंतर त्यातील ११ दाम्पत्यांनी पुन्हा एकत्र नांदण्याचा निर्णय घेतला. एका प्रकरणात पत्नीने पतीच्या छळाला कंटाळून माहेर गाठले होते. ती मुलाला सोबत घेऊन गेली होती. काही दिवसानंतर पतीला चुकीची जाणीव झाली. त्याने पत्नी व मुलाच्या भविष्यासाठी वागणूक सुधारण्याचे वचन दिली. त्यामुळे या दाम्पत्याचा तुटलेला संसार पुन्हा जुळला.

अन्य एका प्रकरणात पत्नीचे सोशल मीडिया व टीव्ही मालिकांचे वेड सुखी संसारात मिठाचा खडा टाकण्यासाठी कारणीभूत ठरले. तिचे पतीवर प्रेम असले तरी सततच्या टोकाटोकीमुळे वाद वाढला अन् ते वेगळे झाले. विभक्त होण्याचे कारण क्षुल्लक होतेे; पण अहंकार जवळ येऊ देत नव्हता. लोकन्यायालयात भविष्यातील परिणामांची जाणीव झाल्यानंतर त्यांनी नव्याने सहजीवन सुरू करण्याचा निर्णय घेतला. हे लोकन्यायालय प्रधान न्यायाधीश मंगला ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.

-----------------

पीडित पक्षकारांना १४० कोटीवर भरपाई

इतर ठिकाणच्या लोकन्यायालयांमध्ये जिल्ह्यातील एकूण १८ हजार ४७६ प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढण्यात आली, तसेच पीडित पक्षकारांना एकूण १४० कोटी २९ लाख रुपये भरपाई मंजूर करण्यात आली. लोकन्यायालयात दिवाणी, फौजदारी, भूसंपादन वाद, वैवाहिक वाद, मोटार अपघात, धनादेश अनादर इत्यादी प्रकारची एकूण ९१ हजार ७८३ प्रकरणे निर्णयासाठी ठेवण्यात आली होती. ती प्रकरणे हाताळण्यासाठी ६० पॅनल तयार करण्यात आले होते. प्रत्येक पॅनलमध्ये एक न्यायाधीश, एक वकील व एक समाजसेवकाचा समावेश होता. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. सी. मोरे यांच्या हस्ते या लोकन्यायालयाचे उद्घाटन करण्यात आले.

Web Title: Some for the benefit of children, some for the sake of love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.