-तर काही हॉटेल्स व रेस्टॉरंट कायमच बंद होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:07 AM2021-04-15T04:07:43+5:302021-04-15T04:07:43+5:30
नागपूर : लॉकडाऊनमुळे हॉटेल्स आणि रेस्टॉरंट संचालकांच्या समस्या आणखी वाढल्या आहेत. हॉटेल व्यवसाय आधीपासूनच मंदीत आहे, तर पार्सल सुविधा ...
नागपूर : लॉकडाऊनमुळे हॉटेल्स आणि रेस्टॉरंट संचालकांच्या समस्या आणखी वाढल्या आहेत. हॉटेल व्यवसाय आधीपासूनच मंदीत आहे, तर पार्सल सुविधा सुरू न करता अनेकांनी रेस्टॉरंट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही व्यवसाय पूर्वीपासूनच शासनाच्या रडारवर आहेत. शासनाने मदत न केल्यास अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट कायमच बंद होणार असल्याची भीती व्यावसायिकांनी व्यक्त केली.
गेल्यावर्षी केंद्र सरकारच्या लॉकडाऊननंतर दोन्ही व्यवसाय सात महिने बंद होते. राज्याने अनलॉक सुरू केले तेव्हाही या व्यवसायाकडे दुर्लक्ष करण्यात आले. व्यवसाय सुरू करण्याच्या शासनाच्या आदेशानंतरही अनेकांनी हॉटेल्स बंद ठेवण्यात धन्यता मानली. ते अजूनही सुरू झालेले नाहीत. व्यवसाय मंदावल्याने काही संचालकांनी रेस्टॉरंटला कुलूप ठोकले. संचालक म्हणाले, खर्च पूर्वीसारखाच आहे. हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळतो. तर भोजनालय आणि नाश्त्याची दुकानातून गरीब व मध्यमवर्गीयांना रोजगार मिळतो. आता या सर्वांवर बेरोजगारीचे संकट आले आहे.
आताच्या लॉकडाऊनमध्ये हॉटेल्स, रेस्टॉरंट, भोजनालय, रस्त्याच्या कडेला लागणारी हॉटेल्स, नाश्ताची दुकाने आदींचा समावेश आहे. पण पूर्वी हा व्यवसाय काही अर्टीनुसार सुरू करण्याची परवानगी मिळाली होती. त्यानंतर वेळेचे बंधन लादल्या गेले. कधी रात्री ८ तर कधी रात्री ९ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी मिळाली. नंतर लॉकडाऊनमध्ये रेस्टॉरंट सायंकाळी ७ पर्यंत सुरू ठेवण्याच्या परवानगीसह शनिवार व रविवारी बंद ठेवण्यात आले. रेस्टॉरंटचा व्यवसाय रात्री ८ नंतर सुरू होतो, शिवाय शनिवार व रविवारी जास्त व्यवसाय होतो. अनावश्यक खर्चापेक्षा रेस्टॉरंट बंद ठेवणे परवडणारे आहे. पार्सल सेवेतून व्यवसाय होत नसल्याचे मत रेस्टॉरंट संचालकांनी व्यक्त केले.
हिरावला अनेकांचा रोजगार
रेसिडेन्शियल हॉटेल्स असोसिएशनचे अध्यक्ष तेजिंदरसिंग रेणू म्हणाले, लॉकडाऊनमुळे हॉटेल्स व रेस्टॉरंटमध्ये कार्यरत अनेकांचा रोजगार हिरावला आहे. अनेकांचे कमी कर्मचाऱ्यांवर काम सुरू आहे. काही हॉटेल्सने कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. जानेवारी महिन्यात स्थिती सुधारल्यानंतर त्यांना कामावर परत बोलविले होते. पण आता पुन्हा घरी बसविण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना वेतनही मिळत नाही.
रेस्टॉरंट बंद ठेवणेच चांगले
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने अनेकांनी कुटुंबीयांसह घराबाहेर निघणे बंद केले आहे. शिवाय पार्सल सेवेला प्रतिसाद नसल्यामुळे अनेकांनी रेस्टॉरंट बंद ठेवण्याचा पर्याय निवडल्याचे मत धंतोली चौकातील रेस्टॉरंट संचालक यादव यांनी सांगितले. आधी कोरोनावर नियंत्रण मिळविणे महत्त्वाचे आहे. परिस्थिती सुधारल्यास पुन्हा रेस्टॉरंट सुरू करू, असे काही संचालक म्हणाले.