फसवणुकाची फंडा, कोट्यवधींचा गंडा; कुणाला नफा तर कुणाला नोकरीच्या नावाखाली लुबाडले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 02:44 PM2023-02-23T14:44:27+5:302023-02-23T14:48:22+5:30

रामदासपेठेतील व्यावसायिकाला ३.१५ कोटींनी तर महिला वकिलाला २.२५ कोटींनी फसवले

Some were robbed in the name of profit and some in the name of job by fraudsters | फसवणुकाची फंडा, कोट्यवधींचा गंडा; कुणाला नफा तर कुणाला नोकरीच्या नावाखाली लुबाडले

फसवणुकाची फंडा, कोट्यवधींचा गंडा; कुणाला नफा तर कुणाला नोकरीच्या नावाखाली लुबाडले

googlenewsNext

नागपूर : फसवणुकीच्या घटना नेहमीच डोळ्यासमोर घडत असतानाही अनेक जण त्या जाळ्यात अडकतात. अशाच काही धक्कादायक घडना नागपुरात उघडकीस आल्या आहेत. रामदासपेठेतील एका व्यावसायिकाला प्रॉपर्टी व्यावसायिकाने डुप्लेक्सचे १४ वर्ष विक्रीपत्रच करून दिले नाही. या घटनेत त्याने ३.१५ कोटींचा गंडा घातला आहे.

दुसऱ्या घटनेत दुप्पट नफ्याचे आमिष दाखवून महिला सरकारी वकिलाला २.२५ कोटींना गंडा घालण्यात आला आहे. तर तिसऱ्या घटनेत 'क्रिप्टो करन्सी'त गुंतवणूक केल्यास खूप जास्त नफा मिळेल असे आमिष दाखवत सायबर गुन्हेगारांनी एका तरुणीची सात लाखांनी फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चौथ्या घटनेत नोकरी लावून देतो म्हणून सायबर गुन्हेगारांनी मेकअप आर्टिस्ट'ची १.४० लाखांनी फसवणूक केली आहे. याप्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

१४ वर्षांनंतरही प्रॉपर्टी व्यावसायिकाने ड्युप्लेक्सचे विक्रीपत्र दिले नाही

१४ वर्षांनंतरदेखील ड्युप्लेक्सचे विक्रीपत्र करून न देता रामदासपेठेतील एका व्यावसायिकाला तब्बल ३.१५ कोटींचा गंडा घालण्यात आला आहे. सीताबर्डी पोलिस ठाण्यात या प्रकरणात प्रॉपर्टी व्यावसायिकासह दोनजणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

राजेश रामस्वरूप सारडा यांचे निती गौरव कॉम्प्लेक्स येथे कार्यालय आहे. ते एका खासगी कंपनीचे संचालक आहेत. ६ ऑक्टोबर २००९ रोजी त्यांनी ग्लॅडस्टोन इन्फ्रास्ट्रक्चरचा संचालक सचिन रामदास मित्तल (रामदासपेठ, दगडी पार्क) व बालकिसन मोहनलाल गांधी (लाडीकर ले आऊट, मानेवाडा) यांच्याकडून ड्युप्लेक्स खरेदीचा सौदा केला. प्रती ड्युप्लेक्स ३० लाखांप्रमाणे एकूण तीन ड्युप्लेक्स खरेदी करण्याबाबत ॲग्रीमेंट टू सेल करण्यात आले होते. त्यांनी त्याचे ३० लाख रुपये आरोपींना दिले होते. २४ महिन्यांच्या मुदतीत ताबा मिळणार होता. मात्र, आरोपींनी टाळाटाळ करून विक्रीपत्र केलेच नाही. शिवाय पैसेदेखील परत केले नाही. त्याच आरोपींनी विविध कारणे देत सारडा यांची मौजा घोगली येथील ३.४७५ चौरस मीटरची मालमत्ता ८.११ कोटी रुपयांत खरेदी केली. त्यांनी सारडा यांना ५.२६ कोटी रुपयेच दिले व उर्वरित २.८५ कोटींची रक्कम दिलीच नाही. अशा प्रकारे मित्तल व गांधीने सारडा यांची ३.१५ कोटींची फसवणूक केली. सारडा यांनी अखेर सीताबर्डी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली व पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला.

दुप्पट नफ्याचे आमिष दाखवून लुटले

आमच्या कंपनीत गुंतवणूक केली तर वर्षभरात दुप्पट नफा मिळेल, असे आमिष दाखवत अहमदनगरच्या एका कुटुंबातील सदस्यांनी नागपुरातील दाम्पत्याला तब्बल २.२५ कोटींचा गंडा घातला. फसवणूक झालेल्या दाम्पत्यापैकी पतीचे निधन झाले असून पैसे परत कसे मिळवावे, या चिंतेत सरकारी वकील असलेली पत्नी आहे. या प्रकरणात बजाजनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ॲड. वर्षा व दूरदर्शनमध्ये कार्यरत असलेले विलास आगलावे (लक्ष्मीनगर) यांची निरंजन रावसाहेब निर्मल (सिद्धेश्वर कॉलनी, अहमदनगर) याच्याशी ओळख होती. निर्मलने त्याच्या कुटुंंबीयांच्या वेगवेगळ्या कंपन्या असून पत्नी प्रीतम, वडील रावसाहेब निर्मल व आई उषा निर्मल हे सर्व त्यात संचालक असल्याची बतावणी केली. जर कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली तर वर्षभरात व्याजासह दुप्पट नफा मिळेल, असे आमिष त्याने दाखविले.

आगलावे दाम्पत्याने त्याच्यावर विश्वास ठेवला व त्याच्याकडे २.४५ कोटींची गुंतवणूक केली. १ जून २०२२ ते १ जानेवारी २०२३ या कालावधीत ही गुंतवणूक करण्यात आली. विलास आगलावे यांची यादरम्यान निधन झाले. निर्मल कुटुंबाने आगलावे यांचे २० लाख रुपयेच परत केले. उर्वरित रक्कम परत मागितली असता आरोपींनी टाळाटाळ केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर वर्षा आगलावे यांनी पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली.

‘क्रिप्टो करन्सी’च्या नावाने सात लाखांची फसवणूक

क्रिप्टो करन्सीत गुंतवणूक केल्यास खूप जास्त नफा मिळेल असे आमिष दाखवत सायबर गुन्हेगारांनी एका तरुणीची सात लाखांची फसवणूक केली. विशेष म्हणजे, संबंधित गुन्हेगारांनी अगोदर तिला संपर्क साधत यू-ट्यूबवर व्हिडीओ ‘लाइक’ करण्यासाठी पैसे दिले होते. तिचा विश्वास बसल्यावर मग त्यांनी तिची फसवणूक केली. हुडकेश्वर पोलिस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तोषिका नागपुरे ही तरुणी पुण्यातील एका कंपनीत जॉब करते. ती कधी कधी नागपुरात येऊन ‘वर्क फ्रॉम होम’देखील करते. डिसेंबर २०२२ मध्ये तिच्या मोबाइलवर ८३२०५६०२७१ या क्रमांकावरून व्हॉट्सॲप मेसेज आला व यू-ट्यूबचे व्हिडीओ ‘लाइक’ केले तर प्रत्येक ‘लाइक’मागे ५० रुपये मिळतील असे सांगण्यात आले. तिने तसे केले असता तिला एकूण सहाशे रुपये पाठविण्यात आले. यामुळे तिचा समोरच्या व्यक्तीवर विश्वास बसला. त्याने मोबाइलवरच मेसेज पाठवून तिला ‘क्रिप्टो करन्सी’मध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखविले.

तिने सुरुवातीला संबंधित व्यक्तीने पाठविलेल्या बँक खात्यात दीड लाख रुपये पाठविले. मात्र, तिला कुठलाही नफा मिळाला नाही. त्यामुळे तिने विचारणा केली असता पाच टास्क पूर्ण करावे लागतील असे तिला सांगण्यात आले. यानंतर तिने परत टप्प्याटप्प्याने एकूण ७.१५ लाख रुपये संबंधिताच्या खात्यावर पाठविले. मात्र, तिला कुठलाही परतावा मिळाला नाही. आपली फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले व तिने वडिलांना याबाबत माहिती दिली. तिचे वडील चिंतामण नागपुरे यांच्या तक्रारीनंतर अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नोकरीच्या नावाखाली ‘मेकअप आर्टिस्ट’ची १.४० लाखांना फसवणूक

नोकरीच्या नावाखाली ‘मेकअप आर्टिस्ट’ची सायबर गुन्हेगारांकडून १.४० लाखांना फसवणूक करण्यात आली. यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.

यशोधरानगर परिसरातील साक्षी ही तरुणी ‘मेकअप आर्टिस्ट’ आहे. १० फेब्रुवारी रोजी दुपारी तिच्या मोबाइल क्रमांकावर अज्ञात व्यक्तीचा फोन आला. त्याने त्याचे नाव अक्षय असे सांगितले व एलएमएल डायरी कंपनीत नेटवर्क मार्केटिंगची नोकरी असल्याचे तिला सांगितले. जाहिरातींचे टार्गेट पूर्ण केल्यास इन्सेंटिव्ह व महिन्याला तीस हजारांहून अधिक पगार मिळेल, असे तिला आमिष दाखविले. लॅपटॉप व इतर नोंदणीसाठी पंधराशे रुपये भरण्यास सांगितले.

साक्षीने ते पैसे भरले. त्यानंतर विविध कारणे सांगत आरोपीने तिला १ लाख ४० हजार रुपये भरायला लावले. तिला आणखी पैसे भरण्यासाठी फोन आला, मात्र तिने नकार दिला व पैसे परत मागितले. मात्र, जर १४ हजार रुपये भरले तरच पैसे परत मिळतील, असे तिला सांगण्यात आले. तिने ते पैसे भरण्यास नकार दिला असता, आतापर्यंत भरलेले पैसे मिळणार नाहीत, असे उत्तर तिला देण्यात आले. तिने चौकशी केली असता, संबंधित कंपनीच फ्रॉड असल्याची बाब समोर आली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तिने यशोधरानगर पोलिस ठाण्यात याविषयी तक्रार दाखल केली. पोलिसांनी अक्षय व चंदन या दोन मोबाइलधारकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Some were robbed in the name of profit and some in the name of job by fraudsters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.