कुठे दमदार, कुठे रिमझिम तुषार, विदर्भात पावसाची दिलासादायक हजेरी
By निशांत वानखेडे | Published: August 18, 2023 07:42 PM2023-08-18T19:42:32+5:302023-08-18T19:42:40+5:30
पूर्व विदर्भात मात्र तुट भरून निघत आहे.
नागपूर : पंधरा दिवसांपासून गायब असलेल्या पावसाने गुरुवारपासून दिलासादायक हजेरी लावली. विदर्भातील काही जिल्ह्यात मुसळधार बरसला तर काही भागात रिमझिम रिपरिप सुरू आहे. मात्र परतलेल्या पावसाने सर्वच जिल्ह्यांना थाेडेफार भिजविले. मात्र हा मुक्काम दाेनच दिवसाचा असल्याचा अंदाज आहे.
परतलेल्या पावसाने भंडारा, चंद्रपूर, गडचिराेली जिल्ह्यात जाेरदार बॅटिंग केली. शुक्रवार सकाळीपर्यंत भंडारा शहरात सर्वाधिक १२० मि.मी. पावसाची नाेंद झाली. जिल्ह्यातील पवनी, लाखांदूर तालुक्यातही पाऊस चांगला बरसला. चंद्रपूर जिल्ह्यात ब्रम्हपुरीमध्ये १०२ मि.मी. पाऊस झाला. चंद्रपूरसह इतर भागातही रिमझिम सुरू हाेती. गडचिराेलीमध्ये गुरुवारी रात्री ४७ मि.मी. पाऊस झाला. जिल्ह्यात वडसा येथे सर्वाधिक ८६ मि.मी. नाेंद झाली. शिवाय अहेरी, भामरागड, मुलचेरा परिसरातही पावसाचा प्रभाव अधिक हाेता. नागपुरात शुक्रवारी सकाळपर्यंत ३८.७ मि.मी. पाऊस झाला. दुपारपर्यंत रिमझिम हाेती पण त्यानंतर थाेडी उसंत घेत रात्री पुन्हा जाेर वाढविला.
वर्ध्यातही रात्री ४४ व दिवसा ११ मि.मी. नाेंद झाली. अकाेला, अमरावती, यवतमाळात हलका पाऊस झाला. बुलढाण्यात शुक्रवारी हलक्या सरी बरसल्या तर वाशिमला मात्र पावसाने हुलकावणी दिली. विदर्भात आतापर्यंत सरासरी ५९५.९ मि.मी. पावसाची नाेंद झाली आहे. अद्याप १० टक्के तुट आहे पण आजच्या पावसाने तुट भरून निघण्यास मदत झाली. १८ ऑगस्टपर्यंत सरासरी ६८५.२ मि.मी. पाऊस अपेक्षित असताे. अकाेला, अमरावती, बुलढाणा अद्यापही धाेकादायक स्थितीत आहेत. पूर्व विदर्भात मात्र तुट भरून निघत आहे.
दाेनच दिवस मुक्काम
दरम्यान हवामान विभागाच्या अंदाजानुसार आणखी दाेन दिवस म्हणजे १९ व २० ऑगस्टला जाेरदार पाऊस हाेण्याची शक्यता आहे. दाेन दिवस येलाे अलर्ट दिला आहे. त्यानंतर मात्र पुन्हा पाऊस उघडीप देण्याचा अंदाज आहे. त्यामुळे ऑगस्टचा शेवटचा आठवडा काेरडाच जाण्याची शक्यता आहे.