कुणीतरी आम्हाला गाडी द्या हो!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:09 AM2021-03-25T04:09:20+5:302021-03-25T04:09:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : लोकहिताची कामे व प्रकल्पांना गती मिळावी, यासाठी नागपूर मनपात विशेष समित्या गठित करण्यात आल्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकहिताची कामे व प्रकल्पांना गती मिळावी, यासाठी नागपूर मनपात विशेष समित्या गठित करण्यात आल्या आहेत. काही महत्त्वाच्या मुद्यावर समितीचा सल्ला घेतला जातो. काही दिवसापूर्वीच समिती सभापती व उपसभापतींनी पदभार स्वीकारला आहे. कामकाजाचा अभ्यास सुरू आहे. यादरम्यान काही सभापतींनी प्रशासनाकडे वाहनांची मागणी केली आहे. समिती कक्ष असताना काही सभापतींना ॲन्टीचेंबर हवे आहे. सभापतींना याची गरज काय, असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे.
महापौर, विरोधी पक्षनेते, स्थायी समिती अध्यक्ष, सत्तापक्ष नेता यांच्यासोबतच झोनच्या दहा सभापतींना मनपातर्फे वाहने उपलब्ध केली जातात. आधीचे महापौर व विरोधी पक्षनेते यांनी स्वत:च्या गाडीचा वापर केला होता. तसेच विशेष समिती सभापतींनाही वाहने उपलब्ध करण्यात आलेली नव्हती. असे असतानाही दोन-तीन सभापती त्यांना प्रशासनाने वाहन उपलब्ध करावे, यासाठी अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधत आहेत. एवढेच नव्हे तर महापौर व स्थायी समिती अध्यक्षाप्रमाणे आम्हालाही ॲन्टीचेंबर बनवून द्या, असा आग्रह धरत आहेत.
.....
आदेश देण्याचे अधिकार नाही
विशेष समिती सभापतींना मनपा सभागृहाच्या निर्देशानुसार सल्ला देण्याचा अधिकार आहे. लोकांशी संबंधित प्रश्नावर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत काम करू शकतात. मात्र विशेष समिती सभापती व उपसभापतींना अधिकाऱ्यांना आदेश, निर्देश देण्याचे अधिकार मनपा कायद्यात नाही. कामकाजातील त्रुटी, चुका विभागप्रमुख, मनपा आयुक्त, महापौर व पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून यावर आवश्यक निर्णय घेण्याचा सल्ला देऊ शकतात. परंतु नवीन सभापती प्रशासनाला निर्देश देण्यात धन्यता मानत आहेत.