नागपुरात सख्ख्या मुलाने केला विश्वासघात; वृद्ध मातेची न्यायासाठी पायपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 11:36 AM2018-07-28T11:36:44+5:302018-07-28T11:39:36+5:30
नरेश डोंगरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दोन्ही मुलांच्या मुलांना (नातवांना) आपल्या स्थावर मालमत्तेचे वारस बनविले जावे, असे मृत्युपत्र तयार करण्यास निघालेल्या वृद्धेची दोघांनी फसवणूक केली. तिच्या मृत्युपत्राऐवजी दोघांनी तिच्याकडून मालमत्तेचे बक्षीसपत्र करून घेतले. या दोघांमधील मुख्य आरोपी दुसरा तिसरा कुणी नसून वृद्ध महिलेचा सख्खा मोठा मुलगा आहे. मुलाने त्याच्या साथीदाराला हाताशी धरून केलेला विश्वासघात सहन न झाल्यामुळे एक ७५ वर्षीय वृद्ध महिला पोलीस ठाण्यापासून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयापर्यंत पायपीट करीत आहे. माझ्या मुलाने माझ्यासोबत विश्वासघात केला. त्याच्यावर कडक कारवाई करा, अशी तिची मागणी आहे. कांताबाई राजाराम दामले (वय ७५) असे तक्रारदार वृद्धेचे नाव आहे. पोलिसांनी त्यांची तक्रारवजा मागणी बेदखल केल्यामुळे त्या कमालीच्या अस्वस्थ झाल्या आहेत.
कांताबाई पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पंचशीलनगरात राहतात. त्यांना भाऊ (मुलाचे नाव), समर्थ, विकास, प्रभू, दयानंद ही पाच मुले आणि ज्योती नामक मुलगी होती. ज्योतीचे लग्न झाले असून ती चंदीगडला राहते. विकास आणि दयानंद या दोघांचा मृत्यू झाला. समर्थ लष्करीबागमध्ये तर प्रभू पचंशील चौकाजवळ आई कांताबार्इंसोबत राहतो. कांताबाई हृदयरुग्ण आहेत. प्रकृती जास्त खराब झाल्याने त्या एका खासगी इस्पितळात काही दिवसांपूर्वी दाखल झाल्या होत्या. आपले काही खरे नाही, हे लक्षात आल्याने आपल्यानंतर आपल्या स्थावर मालमत्तेचा वाद होऊ नये म्हणून त्यांनी मोठा मुलगा भाऊ याला मृत्युपत्र तयार करण्यास सांगितले. मृत्युपत्रात घराचे वारसदार म्हणून नेहा दयानंद दामले आणि पीयूष भाऊ दामले यांची नावे नमूद करण्यास सांगितले. भाऊ दामलेने त्यास होकार देऊन एस.यू. मोटघरे यांच्या मदतीने कागदपत्र तयार करून घेतले. त्यावर वृद्ध कांताबार्इंच्या सह्या घेतल्या. दरम्यान, काही दिवसांपूर्वी ही कागदपत्रे कांताबार्इंना मिळाली. ती मृत्युपत्राची नसून बक्षीसपत्राची असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मोठा मुलगा भाऊ याने मोटघरेला हाताशी धरून कांताबार्इंच्या नावाने बक्षीसपत्र तयार करून घेतल्याचे यातून स्पष्ट झाले. कांताबाई यांच्या तक्रारीनुसार, त्यांनी भाऊ (मुलगा) याला विचारणा केली असता त्याने त्यांना असंबद्ध उत्तरे दिली.
त्यामुळे कांताबार्इंनी त्याला ते बक्षीसपत्र रद्द करण्यास सांगितले. त्याने दाद दिली नाही म्हणून त्यांनी १९ जुलैला पाचपावली ठाण्यात मुलगा भाऊ तसेच त्याचा साथीदार मोटघरेंविरुद्ध विश्वासघाताची तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याऐवजी हे प्रकरण अदखलपात्र ठरवून वृद्ध कांताबार्इंना कोर्टात दाद मागण्याची समज दिली.
कुणाकडे तक्रार करू ?
पाचपावली पोलिसांनी निराशा केल्यामुळे कांताबार्इंनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार अर्ज दिला. सात दिवस होऊनही त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे वृद्ध कांताबाई अस्वस्थ झाल्या आहेत. त्यांनी लोकमतला येऊन या प्रकरणाची कागदपत्रे दाखवून न्याय मिळवून देण्याची साद घातली आहे. आपल्या सख्ख्या मुलानेच आपल्याशी विश्वासघात केला. आता पोलीसही न्याय देण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत. कोर्टकचेरीत जाऊन वर्षानुवर्षे तारखेसाठी हजर राहायला आपण जगणार आहोत का, असा त्यांचा प्रश्न आहे. मी कुणाकडे तक्रार नोंदवू, असाही प्रश्न त्यांनी केला आहे. या संबंधाने दुसरी बाजू ऐकून घेण्यासाठी त्यांचा मुलगा भाऊ दामले याच्या मोबाईल नंबरवर प्रस्तुत प्रतिनिधीने संपर्क केला. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद (नो रिप्लाय) मिळाला नाही.