मुलासाठी घर गहाण टाकले, गाडीही विकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 12:40 AM2018-07-26T00:40:31+5:302018-07-26T00:47:58+5:30

आपल्या मुलांच्या सुखासाठी एक पिता अनेक अडचणी, त्रास सहन करून कोणताही त्याग करायला तयार असतो. मौदा तालुक्यातील चिरव्हा येथील रहिवासी अनिल डुंभरे हा पिता याच संघर्षाचे जिवंत उदाहरण आहे. बिटा थॅलेसिमिया या आजाराने ग्रस्त आपल्या मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात मदतीसाठी दारोदार भटकणाऱ्या या पित्याने दररोजच्या उपचाराच्या खर्चासाठी परिश्रमाने घेतलेली गाडी विकली व आता स्वत:चे घरही गहाण टाकले आहे. मात्र उपचाराचा खर्चच इतका अवाढव्य आहे की, त्यांचा हा टोकाचा प्रयत्नही अपुरा पडत आहे.

For son house mortgaged,vehicle sold out | मुलासाठी घर गहाण टाकले, गाडीही विकली

मुलासाठी घर गहाण टाकले, गाडीही विकली

Next
ठळक मुद्देअगतिक पित्याची धडपड : बिटा थॅलेसिमियाग्रस्त रिहानच्या उपचारासाठी हवी मदतलोकमत मदतीचा हात

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आपल्या मुलांच्या सुखासाठी एक पिता अनेक अडचणी, त्रास सहन करून कोणताही त्याग करायला तयार असतो. मौदा तालुक्यातील चिरव्हा येथील रहिवासी अनिल डुंभरे हा पिता याच संघर्षाचे जिवंत उदाहरण आहे. बिटा थॅलेसिमिया या आजाराने ग्रस्त आपल्या मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात मदतीसाठी दारोदार भटकणाऱ्या या पित्याने दररोजच्या उपचाराच्या खर्चासाठी परिश्रमाने घेतलेली गाडी विकली व आता स्वत:चे घरही गहाण टाकले आहे. मात्र उपचाराचा खर्चच इतका अवाढव्य आहे की, त्यांचा हा टोकाचा प्रयत्नही अपुरा पडत आहे.
शेतीची कामे, रोजमजुरी, सेंट्रींग, प्लास्टर असे मिळेल ते काम करून कुटुंबाचा गाडा हाकणाऱ्या अनिल डुंभरे यांच्यावर हा अगतिक प्रसंग ओढवला आहे. त्यांचा १७ महिन्यांचा मुलगा रिहानला बिटा थॅलेसिमिया मेजर या धोकादायक आजाराने विळखा घातला आहे. मुलाच्या जन्माने या गरीब कुटुंबात निर्माण झालेला आनंद क्षणात मावळला. पाचव्या महिन्याचा असतानाआजाराचे निदान लागले. उपचारासाठी डॉक्टरांनी सांगितलेल्या अवाढव्य खर्चाने तर डुंभरे कुटुंबाचे हास्यच हिरावून घेतले. तरीही लेकराच्या मायेने वडील मदतीसाठी धावाधाव करीत आहेत. गेल्या १२ महिन्यांपासून त्यांची सतत धडपड सुरू आहे. रिहानला दर आठवड्याला रक्त द्यावे लागते. शिवाय अनेक चाचण्या कराव्या लागतात. अनिल यांनी शक्य होईल तसा उपचार चालविला आहे. स्वत:जवळची जमा व काही संवेदनशील नागरिकांच्या मदतीने त्यांनी सहा-सात लाख रुपये खर्च करून उपचार सुरू ठेवला आहे.
हा आजार बोन मॅरोशी संबंधित आहे व यासाठी बोन मॅरो ट्रान्सप्लान्ट करावा लागतो. नुकतीच रिहान आणि अनिल यांच्या बोन मॅरोची बंगलोर येथे चाचणी करण्यात आली व यामध्ये दोघांचे बोन मॅरो १०० टक्के जुळले आहेत. मात्र प्रत्यक्ष या आॅपरेशनाठी ३० लक्ष रुपये लागत आहेत. त्यांनी स्वत:ची गाडी विकली व वडिलोपार्जित घरही गहाण टाकले आहे. उद्या रस्त्यावर येण्याची वेळ येईल, ही जाणीव असूनही त्यांनी मुलाच्या प्रेमापोटी हा टोकाचा निर्णय घेतला आहे. मात्र हे प्रयत्नही अपुरे पडत आहेत. बोन मॅरो ट्रान्सप्लॉन्ट झाले तर रिहान जगू शकेल, या एवढ्या आशेने त्यांची धडपड चालली आहे. त्यामुळे सेवाभावी संस्था, संवेदनशील नागरिक व दानदात्यांनी आर्थिक मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
ज्या दानदात्यांना मदत करायची असेल त्यांनी अनिल नरहरी डुंभरे यांच्या बँक आॅफ इंडियाच्या खाते क्रमांक ८७६४१०११००१७३९३ यावर मदत जमा करावी. बँकेचा आयएफसी कोड बीकेआयडी०००८७६४ हा आहे. अधिक माहितीसाठी अनिल यांच्या ८३९०८९७५८२ या क्रमांकावर संपर्क साधावा.

 रक्तदात्यांचीही आवश्यकता
रिहानला दर आठवड्याला रक्त द्यावे लागते. अनिल पैशांची जुळवाजुळव करीत असले तरी ब्लड बँकेत रक्तदाते असल्याशिवाय रक्ताचा पुरवठा केला जात नाही. त्यामुळे त्यांना अनेकदा बराच वेळ ताटकळत राहावे लागले व निराशा सहन करावी लागली. त्यामुळे रक्तदात्यांनीही त्यांच्या मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

 

Web Title: For son house mortgaged,vehicle sold out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.