पाय दाबण्यास नकार दिला, मुलाने वडिलांचाच खून केला
By दयानंद पाईकराव | Published: August 18, 2024 05:31 PM2024-08-18T17:31:50+5:302024-08-18T17:32:22+5:30
विकृत मुलाला अटक : सहा महिन्यापूर्वी आला होता तुरुंगाबाहेर, अनेक गुन्हे आहेत दाखल
नागपूर: वडिलांनी पाय दाबण्यास नकार दिल्यामुळे कुख्यात गुन्हेगार असलेल्या मुलाने वडिलांना शिविगाळ करीत त्यांच्या छातीवर, पोटावर, डोक्यावर, बरगड्यांवर व नाकावर हाताबुक्क्यांनी व लाथेने मारहाण केली. यात गंभीर जखमी झाल्यामुळे ६२ वर्षाच्या वडिलांचा मृत्यू झाला. ही घटना कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण अपार्टमेंट नवाबपुरा येथे शनिवारी दुपारी ४.३० ते सायंकाळी ६.३० दरम्यान घडली असून कोतवाली पोलिसांनी आरोपी मुलाला गजाआड केले आहे.
कुशल उर्फ इंगा दत्तात्रय शेंडे (३३, रा. फ्लॅट नं. १ करण अपार्टमेंट नवाबपुरा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी मुलाचे नाव आहे. तर दत्तात्रय बाळकृष्ण शेंडे (६२) असे मारहाणीत मृत्यू झालेल्या वडिलांचे नाव आहे. कोतवाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दत्तात्रय हे आपला मोठा मुलगा प्रणव (३५), आरोपी लहान मुलगा कुशल उर्फ इंगा आणि भावाचा मुलगा चैतन्य उर्फ गणु अनिल शेंडे (२३) यांच्यासोबत राहत होते. शनिवारी आरोपी इंगाने वडिल दत्तात्रय यांना पाय दाबण्यास सांगितले. परंतु वडिलांनी पाय दाबण्यास नकार दिला. त्यामुळे विकृत मनोवृत्ती असलेल्या आरोपी इंगाला राग आला. त्याने वडिलांना शिविगाळ केली. त्यानंतर त्याने वडिलांच्या छातीवर, पोटावर, डोक्यावर, बरगडीवर, नाकावर हाताबुक्यांनी व लाथांनी मारून त्यांना गंभीर जखमी केले.
आरोपी इंगाचा मोठा भाऊ प्रणव व चुलतभाऊ चैतन्य उर्फ गणु यांनी जखमी अवस्थेतील दत्तात्रय यांना उपचारासाठी मेयो रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी दत्तात्रय यांना तपासून मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच कोतवाली ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिषा काशीद यांनी घटनास्थळ गाठले. घटनास्थळावरून रक्ताचे नमुने गोळा करून आरोपी इंगाला ताब्यात घेतले. प्रणव शेंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी आरोपी इंगा विरुद्ध कलम १०३ (१), ३५१ (२) नुसार गुन्हा दाखल करून त्यास अटक केली.
आरोपी इंगाविरुद्ध अनेक गुन्हे दाखल
आरोपी कुशल उर्फ इंगा हा कुख्यात गुन्हेगार आहे. सहा महिन्यांपूर्वी तो तुरुंगातून सुटून आला आहे. त्याच्या विरुद्ध एमपीडीए, खंडणी मागणे, आर्म्स अॅक्ट, मारहाण करणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो विकृत स्वभावाचा आहे. या विकृत स्वभावामुळे त्याने आपल्या वृद्ध वडिलांचाच खून केला.