मिल मजुराचा मुलगा ते कॅबिनेट मंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 12:13 PM2019-11-29T12:13:36+5:302019-11-29T12:16:05+5:30
असे म्हणतात की कुणाचे नशीब कुठे आणि कसे बदलेल सांगता येत नाही. नशीब बदलले की रावाचा रंक व रंकाचा राव व्हायला वेळ लागत नाही. तो मात्र नशिबालाच न मानणारा तरुण.
आनंद डेकाटे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : असे म्हणतात की कुणाचे नशीब कुठे आणि कसे बदलेल सांगता येत नाही. नशीब बदलले की रावाचा रंक व रंकाचा राव व्हायला वेळ लागत नाही. तो मात्र नशिबालाच न मानणारा तरुण. तथागत बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वज्ञानाची प्रेरणा घेतलेला हा तरुण नशिबापेक्षा स्वत:च्या परिश्रमावर, कर्तृत्वावर विश्वास ठेवणारा. म्हणूनच मिल मजुराच्या घरी जन्म घेतलेला, कधी शिक्षणाचीही ऐपत नसलेला व दारिद्र्य पाहिलेला हा तरुण परिश्रमाने शिकला आणि स्वत:च्या कर्तृत्वाने आज कुठल्या कुठे पोहचला. महाराष्ट्र राज्याच्या नवीन सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या डॉ. नितीन राऊत यांचा हा थक्क करणारा संघर्षमय प्रवास. गुरुवारी त्यांनी तिसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली.
अतिशय गरीब कुटुंबात डॉ. नितीन राऊत यांचा जन्म झाला. वडील हे मिल मजूर. स्वातंत्र्याच्या लढाईतही सक्रिय होते. गरिबी अशी की चांगल्या शाळेत शिकण्याचीही ऐपत नव्हती. त्यामुळे आईवडिलांनी त्याला मनपाच्या शाळेत टाकले. तो मुळातच हुशार, त्यामुळे आई तुळजाबाई अशिक्षित असल्या तरी मुलाने चांगल्या शाळेत शिकावे, खूप मोठे व्हावे, अशी तिची इच्छा. एका शिक्षकाच्या मदतीने तिने मुलाला महाल येथील न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये प्रवेश मिळवून दिला. सातवीनंतर ते स्वस्तिक हायस्कूलमध्ये शिकले. एका मिल मजुराचा हा मुलगा आपल्या हुशारीच्या व सामाजिक कार्याच्या भरवशावर आज राज्याचा कॅबिनेट मंत्री बनला.
डॉ. नितीन राऊत हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष आणि अ.भा. काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षाच्या महाविकास आघाडीच्या सरकारचा आज शपथग्रहण सोहळा दिमाखात पार पडला. यात तिन्ही पक्षाकडून प्रत्येकी दोन मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यात काँग्रेसकडून डॉ. नितीन राऊत यांचा समावेश होता, हे विशेष. यावरून काँग्रेसमध्ये त्यांचे असलेले महत्त्व लक्षात येते. परंतु येथपर्यंत ते सहजपणे पोहोचले नाही. त्यासाठी मोठा संघर्ष केला. डॉ. नितीन राऊत हे आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला समजल्या जाणाºया उत्तर नागपूरचे नेतृत्व करतात. त्यामुळे मुळातच सामाजिक आंदोलनातूनच त्यांच्या नेतृत्वाला चालना मिळाली. राजकारणात असूनही सामाजिक आंदोलनाची कास त्यांनी कधीच सोडली नाही. महाविद्यालयीन जीवनापासूनच ते सामाजिक आंदोलनात सक्रिय झाले. दलित पँथर मुव्हमेंट, मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनात निघालेला लाँग मार्च ते खैरलांजी आंदोलनापर्यंत त्यांचा सक्रिय सहभाग राहिला. इंदिरा गांधी यांच्या समर्थनार्थ पुकारण्यात आलेल्या आंदोलनात त्यांनी तुरुंगवासही भोगला आहे. बौद्धांसाठी स्वतंत्र कायदा व्हावा, यासाठी ते आग्रही होते. तसे बिलसुद्धा त्यांनी सादर केले.
मुळातच हुशार व अभ्यासू राजकारणी असलेल्या डॉ. नितीन राऊत यांची ज्ञानोपासना संपली नाही. ते बीएस्सी आहेत. कमर्शियल पायलट (सीपीएल) आहेत. यासोबतच त्यांनी आंबेडकर थॉट्समध्ये एम.ए. व पीएच.डी. पूर्ण केली आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी एम. एफ. ए.(ड्रामा) सुद्धा केले आहे. इतकेच नव्हे बुद्धिस्ट पर्सनल लॉ, आंबेडकर आॅन पॉप्युलेशन, बुद्धिझम अॅण्ड दलित : सोशल फिलोसॉफी अॅण्ड ट्रेडिशन आणि सेपरेट बुद्धिस्ट लॉ ए ससपेक्ट ही पुस्तकेही त्यांची प्रकाशित झाली आहेत. त्यांना अनेक पुरस्कारसुद्धा मिळाले आहेत. यामध्ये युनायटेड नेशनचा ह्युमन राईट्स इंडिजिनिअस पीपल्स, कॅनडा येथील सोशल जस्टीस अॅण्ड ट्रान्सफॉर्मेशन, अमेरिकेतील बायोग्राफिकल सोसायटीतर्फे मॅन आॅफ द इयर आणि प्रबुद्ध रत्न पुरस्कार या महत्त्वांच्या पुरस्कारांचा समावेश आहे. मंत्रिपदाची शपथ घेत असताना त्यांच्यावर असलेला आई-वडिलांच्या संस्काराचा प्रभाव आजही कायम आहे. शपथग्रहण सोहळ्यात वडिलांसोबतच आईच्या नावाचा उल्लेखही केला. सोबत नसानसात भिनलेली तथागत बुद्ध व आंबेडकरी विचारांची बांधिलकी त्यांनी आपल्या शपथेतून व्यक्त केली.
सामाजिक सेवेचा ‘संकल्प’
डॉ. नितीन राऊत यांनी संकल्प या एनजीओद्वारे तरुणांची मोट बांधली. या संकल्पाद्वारे अन्यायग्रस्त मागासवर्गीयांना न्याय मिळवून देणे, सेवा देण्याचे काम करण्यात येते. दीक्षाभूमी येथे दरवर्षी होणाºया धम्मचक्र प्रवर्तन दिनी देशभरातून येणाºया लाखो अनुयायांना भोजनदान व इतर सेवा दिली जाते. १९८६ पासून ही सेवा अविरत सुरू आहे. यासोबतच १९९१ मध्ये आलेल्या मोवाड येथील पुरात हजारो नागरिक विस्थापित झाले. त्या काळात संकल्पच्या तरुणांनी सलग १५ दिवस मोवाडमधील नागरिकांची सेवा केली. यासोबतच संकल्पतर्फे वर्षभर लोकांची कुठल्या ना कुठल्या पद्धतीने मदत केली जाते.
महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनातही सक्रिय सहभाग
भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या नेतृत्वात बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन लढले जात आहे. हे आंदोलन ऐन भरात होते. तेव्हा डॉ. नितीन राऊत हे सुद्धा त्यात सक्रिय होते. या आंदोलनाशी ते आजही जुळलेले आहेत. यासोबतच हैदराबाद सध्या तेलंगणा येथील हुसैन सागर तलावातून निघालेली तथागत गौतम बुद्ध यांची भव्य मूर्ती तलावाच्या मधोमधच स्थापित व्हावी, यासाठी भव्य आंदोलन पुकारण्यात आले होते. या आंदोलनातही डॉ. नितीन राऊत यांचा सक्रिय सहभाग होता.