ग्राहकास फसविणे सोना कन्स्ट्रक्शनच्या आंगलट; १.४४ लाख रुपये परत करण्याचा आदेश
By राकेश पांडुरंग घानोडे | Published: April 3, 2023 06:53 PM2023-04-03T18:53:57+5:302023-04-03T18:54:17+5:30
एका महिला ग्राहकास फसविणे सोना कन्स्ट्रक्शन बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्सच्या आंगलट आले आहे.
नागपूर : एका महिला ग्राहकास फसविणे सोना कन्स्ट्रक्शन बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्सच्या आंगलट आले आहे. अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने पीडित ग्राहकाचे १ लाख ४४ हजार रुपये १८ टक्के व्याजासह परत करण्याचा आदेश सोना कन्स्ट्रक्शनला दिला आहे.
व्याज २८ डिसेंबर २०१६ ते प्रत्यक्ष रक्कम अदा करण्याच्या तारखेपर्यंत लागू करण्यात आले आहे. तसेच, ग्राहकाला शारीरिक-मानसिक त्रासाकरिता ३० हजार व तक्रार खर्चापोटी १५ हजार रुपये भरपाईही मंजूर करण्यात आली आहे. ही रक्कम सोना कन्स्ट्रक्शननेच द्यायची आहे. ज्योती कोहाड, असे ग्राहकाचे नाव असून त्या काटोल नाका परिसरातील रहिवासी आहेत. त्यांना आयोगाचे अध्यक्ष अतुल आळशी व सदस्य अविनाश प्रभुणे यांनी हा दिलासा दिला.
कोहाड यांनी सोना कन्स्ट्रक्शनच्या कोलार येथील ले-आऊटमधील एक भूखंड ३ लाख ७२ हजार रुपयांत खरेदी केला आहे. यासंदर्भात २२ नोव्हेंबर २०१५ रोजी करार झाला आहे. त्यानंतर कोहाड यांनी सोना कन्स्ट्रक्शनला वेळोवेळी एकूण १ लाख ४४ हजार रुपये दिले. दरम्यान, त्यांनी भूखंडाचे विक्रीपत्र नोंदवून देण्याची मागणी केली. परंतु, सोना कन्स्ट्रक्शनने संबंधित जमिनीसंदर्भात न्यायालयात वाद प्रलंबित असल्याचे सांगून विक्रीपत्र नोंदवून देण्यास नकार दिला. कोहाड यांनी अधिक चौकशी केल्यानंतर संबंधित जमीन सोना कन्स्ट्रक्शनच्या नावावर नसल्याची माहिती मिळाली. त्यावरून सोना कन्स्ट्रक्शनने फसवणूक केल्याचे स्पष्ट झाल्यामुळे कोहाड यांनी ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली होती.