किशोरदा घरीही नेहमीच गीत गुणगुणत असायचे
By admin | Published: August 4, 2014 12:58 AM2014-08-04T00:58:35+5:302014-08-04T01:21:47+5:30
किशोरकाकांची आज मला खूप आठवण येते. आम्ही लहान होतो पण किशोरकाकांकडे माझा प्रत्येक उन्हाळा जायचा. त्यांचे माझ्यावर खूप प्रेम होते. त्यांच्यासोबत राहणे म्हणजे मस्ती आणि मस्ती.
किशोरकुमार यांची पुतणी चंद्रा संन्याल यांच्या आठवणी : आज किशोरकुमार यांचा जन्मदिन
नागपूर : किशोरकाकांची आज मला खूप आठवण येते. आम्ही लहान होतो पण किशोरकाकांकडे माझा प्रत्येक उन्हाळा जायचा. त्यांचे माझ्यावर खूप प्रेम होते. त्यांच्यासोबत राहणे म्हणजे मस्ती आणि मस्ती. त्यामुळे आम्हा लहान मुलांना किशोरकाका खूप आवडायचे. घरी असले की खूप विनोद आणि अंगविक्षेप करून ते आम्हा सर्व घरातल्या लहान मुलांना हसवत ठेवायचे. त्यामुळेच ते आम्हाला आवडायचे. पण ते शिस्तीचे पक्के होते. घरी वरच्या खोलीत त्यांचा स्टुडिओ होता. तेथे गीतांवर चर्चा सुरू असताना आम्ही मस्ती केली तर ते खूप चिडून जायचे. घरात असतानाही ते काहीतरी नवीन सापडल्यासारखे गुणगुणतच राहायचे. त्यांच्या प्रत्येक खोलीत एक टीव्ही आणि रेकॉर्डिंगचे सामान असायचे. कुठल्याही खोलीत नवीन चाल सुचली की ते रेकॉर्ड करून ठेवायचे आणि एस. डी. व आर. डी. बर्मन यांना ऐकवायचे. मला आठवते अनेक बाबतीत तर एस. डी. बर्मनही किशोरकाकांवरच विसंबून राहायचे. मधुबाला काकीच्या सौंदर्याबद्दल तर आम्हालाही खूप आकर्षण होते. एकदा आम्ही लहान मुलांनी मधुबाला काकीच्या खोलीत प्रवेश केला आणि त्यांची कॉस्मेटिक शोधण्याचा प्रयत्न केला. आम्हाला वाटले, खूप कॉस्मेटिक लावल्याशिवाय इतके सुंदर कुणी दिसूच शकत नाही. पण त्या कुठलेही कॉस्मेटिक वापरतच नव्हत्या. त्यांच्या खोलीत आम्हाला हलक्या गुलाबी रंगाचे फक्त लिपस्टीक सापडले. मधुबाला काकीशी माझे खूप जमायचे. काकी गेल्यावर किशोरकाकांना खूप दु:ख झाले होते.