गान‘सरस्वती’ला नागपूरकरातून ‘रेकार्डब्रेक’ मानवंदना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 10:36 PM2019-09-26T22:36:17+5:302019-09-26T22:38:02+5:30
नागपूर शहरातील हार्मोनी इव्हेंट्स या संगीत संस्थेच्यावतीने २८ सप्टेंबर रोजी लतादीदींच्या ९० व्या वाढदिवशी एकाच वेळी ९० ठिकाणी संगीतमय मानवंदना देणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या सहा दशकांपेक्षा अधिक काळापासून हिंदी आणि इतर प्रादेशिक भाषांमधून आपल्या अलौकिक स्वरांनी कोट्यवधी देशवासीयांना स्वर्गीय व ईश्वरीय आनंद प्रदान करणाऱ्या गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर या येत्या २८ सप्टेंबर रोजी वयाच्या ९० व्या वर्षात पदार्पण करणार आहेत. हिंदी चित्रपटसंगीताचे सुवर्णयुग साकारण्यात मोलाचे योगदान देणाऱ्या लतादीदींच्या सुमधूर आवाजातील हजारो गाणी म्हणजे तमाम रसिकांच्या मर्मबंधातील ठेव आहेत. भारतीयांसाठी अमूल्य भेट असलेल्या या गानकोकिळेचा जन्मदिन साजरा करण्यासाठी त्यांचे चाहते सरसावले आहेत. नागपूरकर चाहतेही त्यासाठी सरसावले असून या लाडक्या गायिकेला मानवंदना देताना थेट विश्वविक्रमाला गवसणी घालण्याची तयारी सुरू केली आहे.
शहरातील हार्मोनी इव्हेंट्स या संगीत संस्थेच्यावतीने २८ सप्टेंबर रोजी लतादीदींच्या ९० व्या वाढदिवशी एकाच वेळी ९० ठिकाणी संगीतमय मानवंदना देणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. हार्मोनीचे संचालक राजेश समर्थ यांच्या संकल्पनेतून ‘सरस्वती’ हा कार्यक्रम आकाराला आला आहे. समर्थ यांनी दिलेल्या माहितीनुसार सुरेश भट सभागृहातील प्रमुख कार्यक्रमासह नागपूर शहरात ६० ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे. याशिवाय पुण्यातील ९ कार्यक्रमांसह उर्वरित महाराष्ट्रात २९ ठिकाणी सरस्वती या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. या प्रत्येक कार्यक्रमात स्थानिक कलावंतांना सहभागी होण्याची संधी दिली जाणार आहे. हार्मोनीतर्फे माटुंगा, मुंबई येथे उषा मंगेशकर आणि पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. एक विशेष कार्यक्रम याच दिवशी इंग्लंडमध्येही होणार असल्याचे समर्थ यांनी सांगितले. विशेष म्हणजे एकाच वेळी ७३ ठिकाणी कार्यक्रम घेण्याचा विश्वविक्रम युकेमधील संस्थेने नोंदविला आहे. लतादीदींच्या जन्मदिनी होणाऱ्या सरस्वती या कार्यक्रमाद्वारे हा विक्रम मोडित काढून नवा गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकार्ड स्थापित होणार असल्याचा विश्वास राजेश समर्थ यांनी व्यक्त केला. या विक्रमी आयोजनात शेफ विष्णू मनोहर, निवेदिका श्वेता शेलगावकर, मनीष पाटील, विजय जथे, दीपाली सप्रे, भास्कर वागुले, मनोज पिदडी, सुनील बोंबले व कर्नल वानखेडे यांचा सहभाग आहे.
इतर महत्त्वाचे कार्यक्रम
लता मंगेशकर यांना मानवंदना देणारे विविध कार्यक्रम शनिवारी शहरात आयोजित करण्यात आले आहेत. याअंतर्गत सूरसप्तकतर्फे २८ सप्टेंबरपासून लता संगीत समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंटिफिक सभागृह, लक्ष्मीनगर येथे सायंकाळी ६ वाजता लतादीदींच्या हिंदी गीतांवर आधारित ‘तुम जियो हजारो साल’ या कार्यक्रमाने महोत्सवाला सुरुवात होईल. २९ रोजी ‘स्वरलते, तुज मानाचा मुजरा’ या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. यात त्यांच्यावर सुचित्रा कातरकर यांनी रचलेली व गायलेली मराठी गीते सादर केली जाणार आहेत. याशिवाय सूरसंगम नाशिक, चेरी बेरी लाईव्ह मुंबई आणि दि गोल्डन व्हाईस स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी सायंकाळी ६.३० वाजता वसंतराव देशपांडे सभागृहात ‘अभिनेत्री’ या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. यात लता मंगेशकर यांनी ७० अभिनेत्रींसाठी गायिलेली गाणी सादर केली जाणार आहेत.