सोनिया व राहुल गांधी यांची ११ रोजी सभा
By admin | Published: April 2, 2016 03:22 AM2016-04-02T03:22:32+5:302016-04-02T03:22:32+5:30
अ.भा. काँग्रेस समितीतर्फे ११ एप्रिल रोजी नागपुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्ष सोहळ्याचा समारोपीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
दीक्षाभूमीवर जाऊन दर्शन घेणार :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती
नागपूर : अ.भा. काँग्रेस समितीतर्फे ११ एप्रिल रोजी नागपुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्ष सोहळ्याचा समारोपीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे हे दोन्ही नेते दीक्षाभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेणार आहेत. काँगेसचे शीर्षस्थ दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार असल्यामुळे काँग्रेस नेत्यांनी ही सभा अतिशय गांभीर्याने घेतली असून जोरात तयारी चालविली आहे.
प्रदेश काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी निश्चित केलेल्या कार्यक्रमानुसार दुपारी ४ वाजता विमानाने सोनिया व राहुल गांधी यांचे दिल्लीहून विमानाने नागपुरात आगमन होईल. दुपारी ४.३० वाजता ते दीक्षाभूमीवर जाऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेऊन अभिवादन करतील. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता कस्तुरचंद पार्क येथे आयोजित जाहीर सभेला मार्गदर्शन करतील. नागपुरात उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे हा कार्यक्रम तासभर पुढे ढकलण्याचाही विचार सुरू आहे. सभेला लाखावर गर्दी होईल, असा दावा प्रदेश काँग्रेसने केला आहे.
प्रदेशाध्यक्षांनी घेतल्या मॅराथॉन बैठका
नागपूर : सभेच्या तयासाठी आज, शुक्रवारी नागपुरात अ.भा. काँग्रेस समितीचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदेश अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी मॅराथॉन बैठका घेतल्या. बैठकीला माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, काँग्रेसच्या अनुसूचित जाती आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष के. राजू, सेवादलाचे अध्यक्ष चंद्रकांत दायमा, माजी मंत्री नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी, अनिस अहमद, शिवाजीराव मोघे, नसीम खान, राजेंद्र मुळक, आ. शरद रणपिसे, आ. विजय वडेट्टीवार, माजी आ. अशोक धवड, अनंतराव घारड, डॉ.बबनराव तायवाडे, नागपूर शहर अध्यक्ष विकास ठाकरे, जिल्हाध्यक्ष सुनीता गावंडे, यांच्यासह विदर्भातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
दिग्विजय सिंह यांनी नागपुरात आगमन होताच दीक्षाभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्र्शन घेतले. तेथे लागलेल्या छायाचित्रांची पाहणी केली.
सोनिया व राहुल गांधी देखील येथे भेट देणार असल्याच्या पार्श्वभूमीवर सिंह यांनी आढावा घेतला. त्यांच्यासोबत माजी मंत्री नितीन राऊत, अनिस अहमद होते. यानंतर सिंग यांनी कस्तुरचंद पार्कची पाहणी केली. (प्रतिनिधी)