सोंटू जैनने चार कोटींमध्ये केली बँक मॅनेजरशी 'डील', मोबाइलमधील ऑडियो रेकॉर्डिंगने केला घात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2023 12:28 PM2023-10-21T12:28:06+5:302023-10-21T12:29:31+5:30

‘फ्रीज’ होण्याअगोदरच लॉकर केले ‘साफ’ : गोपनीय पत्राची माहिती केली ‘लिक’

Sontu Jain 'Deal' with Bank Manager for Rs 4 Crores, Ambush by Audio Recording in Mobile | सोंटू जैनने चार कोटींमध्ये केली बँक मॅनेजरशी 'डील', मोबाइलमधील ऑडियो रेकॉर्डिंगने केला घात

सोंटू जैनने चार कोटींमध्ये केली बँक मॅनेजरशी 'डील', मोबाइलमधील ऑडियो रेकॉर्डिंगने केला घात

योगेश पांडे

नागपूर : सोंटू जैनच्या लॉकरमधील कोट्यवधींची रोकड व सोने परस्पर हलविण्याच्या प्रकारामुळे त्याच्या वर्तुळातील लोकांना मोठा हादरा बसला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे सोंटूने त्याच्या ‘फ्रीज’ होऊ शकणाऱ्या सर्व लॉकर्समधील रक्कम हलविण्यासाठी गोंदियातील ॲक्सिस बँकेचा मॅनेजर अंकेश खंडेलवाल याच्याशी चार कोटींमध्ये ‘डील’ केली होती. मात्र सोंटूच्या फॉर्मेट झालेल्या मोबाइलमधील ‘डेटा’ सायबरतज्ज्ञांनी शोधून काढला व त्यातील ऑडियो रेकॉर्डिंगमधून पोलिसांना या ‘गोलमाल’ची ‘लिंक’ भेटली, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

सोंटूच्या घरी जुलै महिन्यात धाड टाकण्यात आली व त्यानंतर हे प्रकरण समोर आले. त्या वेळी सोंटू दुबईत होता. २३ जुलै रोजी नागपूर पोलिसांनी सोंटूचे खाते व लॉकर ‘फ्रीज’ करण्यासंदर्भात गोपनीय पत्र ॲक्सिस बँकेच्या गोंदिया शाखेला पाठविले होते व १ ऑगस्ट रोजी नागपूर पोलिसांच्या पथकाने त्याचे तसेच त्याच्या कुटुंबीयांच्या लॉकरची तपासणी करून ते ‘फ्रीझ’ केले. मात्र मॅनेजर अंकेश खंडेलवाल याच्यामुळे खरा खेळ यादरम्यानच झाला.

लॉकरमधील माया दुसरीकडे हलविण्यासाठी खंडेलवाल मदत करू शकतो, अशी माहिती सोंटूला दुबईत मिळाली. त्याने खंडेलवालशी संपर्क साधला व या कामासाठी दोघांमध्ये चार कोटींमध्ये ‘डील’ झाली. खंडेलवालने सोंटूला नागपूर पोलिसांच्या गोपनीय पत्राबाबत माहिती दिली. सोंटूने लगेच त्याचा लहानपणचा मित्र डॉ. गौरव बग्गा याच्याशी संपर्क साधला आणि त्याच्या लॉकर्समध्ये सोंटूच्या लॉकरमधील ८५ लाखांची रोकड व सोने हलविण्यात आले. याशिवाय सोंटूची आई कुसुमदेवी, भाऊ धीरज ऊर्फ मोंटू तसेच वहिनी श्रद्धा यांच्या लॉकर्समधील कोट्यवधीदेखील अशाच पद्धतीने हलविण्यात आले.

‘आयफोन’मधील ‘डेटा’ परत मिळाला आणि ‘लिंक’ लागली

सोंटू अटक होण्याअगोदर जेव्हा चौकशीला येत होता तेव्हा त्याने मोबाइल दुबईच्या हॉटेलमधील बाथरूममध्ये विसरल्याचे सांगितले होते. मात्र त्याला अटक झाल्यावर पोलिसांनी त्याचा ‘आयफोन १४’ जप्त केला. सोंटूने मोबाइलमधील ‘डेटा’ उडविला होता व तो निश्चिंत होता. मात्र तंत्रज्ञानाच्या मदतीने सायबरतज्ज्ञांनी त्याचा ‘डेटा’ परत मिळविला. त्यातील ऑडियो रेकॉर्डिंग ऐकले असता पोलिसांना लॉकरमधील या प्रकाराची ‘लिंक’ लागली.

एका दिवसात उघडले डॉक्टरचे लॉकर

सोंटूच्या सांगण्यावरून गोंदियातील बँक मॅनेजर अंकेश खंडेलवाल याने डॉ. गौरव बग्गा याच्याशी संपर्क केला. संबंधित बँकेत बग्गाचे लॉकर किंवा खाते नव्हते. एकीकडे लॉकरसाठी ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागते. मात्र खंडेलवालने केवळ एका दिवसात डॉ. गौरव बग्गा व त्याची बायको गरिमा यांचे खाते व लॉकर उघडले.

पोलिसांच्या ‘टार्गेट’वर आणखी परिचित

संबंधित प्रकरणाच्या तपासात आणखी लोक सहभागी असल्याची शक्यता आहे. गंभीर गुन्हा दाखल असतानाही आरोपींनी सोंटूला पळून जाताना ज्या प्रकारे मदत केली ते अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणाच्या तपासात आरोपींची संख्या वाढणार असल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले.

Web Title: Sontu Jain 'Deal' with Bank Manager for Rs 4 Crores, Ambush by Audio Recording in Mobile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.