सोंटू जैनच्या क्रिकेट सट्ट्याचे दुबई-लंडनपर्यंत जाळे!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 10:52 AM2023-10-02T10:52:27+5:302023-10-02T10:55:30+5:30
गोंदियाच्या ज्वेलरी व्यापाऱ्याची चौकशी : ५८ कोटींचा गंडा घालणारा सोंटू पसारच
नागपूर : ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून व्यापाऱ्याची ५८ कोटींची फसवणूक करणारा सोंटू जैन पोलिसांच्या हलगर्जीचा फायदा घेत फरार झाला होता. तो अद्यापही पोलिसांना सापडलेला नाही. दरम्यान, पोलिसांनी गोंदियातील एका ज्वेलरी व्यापाऱ्याची शनिवारी चौकशी केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोंटू हा फसवणुकीच्या पैशांतून सोने खरेदी करायचा व ते सोने संबंधित व्यापाऱ्याकडून घेण्यावर त्याचा भर असायचा. चौकशीदरम्यान व्यापाऱ्याने त्याला काहीच माहिती नसल्याचा दावा केला आहे.
२६ सप्टेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोंटूचा अंतरिम जामीन रद्द केला होता. त्या दिवशी तो उच्च न्यायालयाच्या परिसरात आला होता. न्यायालयाने जामीन रद्द केल्यावर सोंटू तेथून हॉटेलमध्ये पोहोचला व तेथून पोलिस येण्याअगोदरच ऑटोतून फरार झाला. बराच शोध घेऊनही तो पोलिसांच्या हाती लागला नाही. तीन-चार ऑटो बदलून तो शहराबाहेर गेला. यानंतर तो दुसऱ्या राज्यात पोहोचला. एका चुकीमुळे पोलिसांनी सोंटूला पकडण्याची संधी गमावली. २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी नागपुरात आल्यानंतरच सोंटूने मोबाइल बंद केला होता. त्यामुळे तो अटक टाळण्यासाठी पूर्ण प्रयत्नात असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. असे असूनही पोलिस त्याच्यावर पाळत ठेवू शकले नाहीत. सोंटूचा क्रिकेट सट्टेबाजीचा व्यवसाय दुबई-लंडनपर्यंत पसरलेला आहे. देशातील अनेक शहरांतील बडे बुकी त्याच्याशी निगडित आहेत. त्यांच्या मदतीने सोंटू लपला असल्याची शक्यता आहे.