सोंटूचा फोकनाड फंडा, दुबईच्या बाथरूममध्ये मोबाइल विसरला अन लॅपटॉप हरवला

By योगेश पांडे | Published: October 17, 2023 01:53 PM2023-10-17T13:53:15+5:302023-10-17T13:56:11+5:30

सोंटूच्या डिजिटल फुटप्रिंट्सचा शोध सुरू : आता पोलिस दाखविणार कायद्याचा खरा 'मॅजिक शो', डायमंड एक्सचेंज डॉक व्यतिरिक्त दोन आयडी समोर

Sontu Jain's Fake Funda; Pretend to lose mobile and laptop | सोंटूचा फोकनाड फंडा, दुबईच्या बाथरूममध्ये मोबाइल विसरला अन लॅपटॉप हरवला

सोंटूचा फोकनाड फंडा, दुबईच्या बाथरूममध्ये मोबाइल विसरला अन लॅपटॉप हरवला

योगेश पांडे

नागपूर : आंतरराष्ट्रीय बुकी सोंटू जैन याला अखेर पोलिस कोठडी मिळाल्यामुळे अनेक तथ्ये समोर येण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. याअगोदर पोलिसांसमोर चौकशीसमोर आला असताना सोंटू ‘आपल्याला काहीच होणार नाही’ या थाटात वावरत होता व त्याने पोलिसांनाच ‘फोकनाड फंडा’ दिला होता. पोलिसांनी त्याला मोबाइलची मागणी केली असता त्याने मोबाइल तर दुबईच्या हॉटेलमध्ये विसरलो आणि लॅपटॉप तर कुठेतरी हरवला असे उत्तर दिले होते. आता चौकशीदरम्यान पोलिस दुबईच्या हॉटेलमधील हरविलेला मोबाइल नागपुरात शोधून सोंटूलाच कायद्याचा खरा ‘मॅजिक शो’ दाखवतील, असा विश्वास पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

आंतरराष्ट्रीय बुकी असलेल्या सोंटू जैनने सोमवारी न्यायालयात आत्मसमर्पण केले. पोलिस याच संधीची वाट पाहत होते. अटक झाली नसताना सोंटू ज्यावेळी चौकशीसाठी येत होता तेव्हा त्याचा तोरा वेगळाच होता. त्यामुळे पोलिसांनादेखील त्याने गंभीरतेने घेतले नव्हते व त्याने उडवाउडवीची तसेच संभ्रमित करणारी माहिती दिली होती. आता त्याला पोलिस कस्टडी मिळाल्याने गंभीर चौकशीच्या मूडमध्येच पोलिस असून सोंटूकडून तथ्य बाहेर काढण्यावरच भर राहणार आहे.

सोंटूचे डिजिटल रेकॉर्ड जप्त करणार

संबंधित गेमिंगचे संचालन विदेशातूनच होत होते. त्याचे अपवर्ड लिंकेज शोधण्यावर पोलिसांचा भर आहेच. शिवाय गेमिंगमधील आयडी कुठून तयार झाले होते त्याचा शोधदेखील सुरू आहे. या गेमिंगच्या रॅकेटचे कंट्रोलर कोण होते, सॉफ्टवेअर कुणी तयार केले होते व बॅकएन्ड सपोर्ट सॉफ्टवेअर डेव्हलपर कोण होते याचा तपास सोंटूचा मोबाइल, लॅपटॉप व डिजिटल फुटप्रिंट्समधून मिळू शकणार आहे. सोंटूचा स्वत:चादेखील वेगळा आयडी होता अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. या रॅकेटमध्ये डायमंड एक्सचेंज.डॉक व्यतिरिक्त आणखी दोन आयडी समोर आले आहेत. याशिवाय या रॅकेटमध्ये इतर गेमिंग ॲप्सच्या माध्यमातूनदेखील फसवणूक सुरू असल्याची पोलिसांना शंका आहे. चौकशीदरम्यान सर्वात अगोदर सोंटूचे डिजिटल रेकॉर्ड जप्त करण्यात येणार आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

सोंटूविरोधात तक्रार केली तर...व्यापाऱ्यांमध्ये भीती

सोंटूने नागपुरातील व्यापारी विक्रांत अग्रवाल यांना ५८ कोटींचा गंडा घातला होता. सोंटूने केवळ अग्रवालच नव्हे तर त्यांच्यासारख्या अनेक व्यापाऱ्यांना फसविले आहे. पोलिसांना काही जणांची नावेदेखील चौकशीदरम्यान कळाली असून त्यांच्याशी संपर्कदेखील साधण्यात आला. मात्र आम्हाला कुठलीही तक्रार करायची नाही, अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनीदेखील या माहितीला दुजोरा दिला आहे. काही लोक तक्रार देण्यास इच्छुक नाहीत. मात्र अशा व्यापाऱ्यांनी समोर येऊन न घाबरता तक्रार केली पाहिजे, असे आवाहन पोलिस विभागातर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Sontu Jain's Fake Funda; Pretend to lose mobile and laptop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.