सोंटू जैनचे ‘दुबई लिंक’वर मौन, पोलिसांची दिशाभूल करणे सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 11:24 AM2023-09-13T11:24:33+5:302023-09-13T11:25:13+5:30
नागपुरातील एका व्यापाऱ्याची फसवणूक करणाऱ्या सोंटू जैनविरोधात जुलै महिन्यात गुन्हा दाखल झाला होता
नागपूर : ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून नागपुरातील एका व्यापाराला ५८ कोटींचा गंडा घालणाऱ्या सोंटू जैनची गुन्हे शाखेकडून कसून चौकशी सुरू आहे. मात्र, सोंटूने त्याच्या दुबई लिंकवर अद्यापही हवी तशी माहिती दिलेली नाही. त्याने चौकशीदरम्यान काही बुकींची माहिती दिली आहे. मात्र, त्याच्या माहितीवर पोलिसांना फारसा विश्वास नसून त्याची खातरजमा करण्यात येत आहे.
नागपुरातील एका व्यापाऱ्याची फसवणूक करणाऱ्या सोंटू जैनविरोधात जुलै महिन्यात गुन्हा दाखल झाला होता. त्याअगोदर तो दुबईला निघून गेला होता. गोंदियात पोलिसांनी बराच तपास केला व १७ कोटी रोख रकमेसह १४ किलो सोने २९५ किलो चांदी जप्त केली होती. त्याच्या नागपुरातील लॉकर्समधूनदेखील साडेचार कोटींचे दागिने जप्त केले होते. सोंटूने अटक टाळण्याचे खूप प्रयत्न केले व तो न्यायालयातदेखील गेला. अखेर त्याला नागपुरात परतावे लागले. त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली.
गुन्हे शाखेच्या पथकाकडून त्याची मॅरेथॉन चौकशी करण्यात आली. यात त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने चौकशी केली असता सोंटूने काही बुकी व लिंक्सबाबत माहिती दिली. त्यात गुजरातमधील काही बुकींची नावेदेखील समोर आल्याची माहिती आहे. मात्र, दुबईत त्याच्या नेमक्या काय लिंक्स आहेत व या रॅकेटचा मास्टरमाईंड कोण आहे याबाबत अद्यापही ठोस माहिती मिळाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.