हवालाची रक्कम पकडताच नागपूरवाले भूमिगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:08 AM2021-07-29T04:08:42+5:302021-07-29T04:08:42+5:30

नरेश डोंगरे । लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अमरावती पोलिसांनी मंगळवारी पहाटे सहाजणांना ताब्यात घेऊन हवालाचे साडेतीन कोटी रुपये ...

As soon as the amount of hawala was seized, Nagpurwale went underground | हवालाची रक्कम पकडताच नागपूरवाले भूमिगत

हवालाची रक्कम पकडताच नागपूरवाले भूमिगत

Next

नरेश डोंगरे ।

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : अमरावती पोलिसांनी मंगळवारी पहाटे सहाजणांना ताब्यात घेऊन हवालाचे साडेतीन कोटी रुपये जप्त करताच नागपुरातील त्यांचे साथीदार भूमिगत झाले. दरम्यान, ही रोकड गुजरात बेस असलेल्या मे. मेकटेक कंपनीची असून, या कंपनीचे देशभरात नेटवर्क असल्याची माहिती खास सूत्रांनी ‘लोकमत’ला दिली आहे. मंगळवारी अमरावतीचे पोलीस पथक या कंपनीच्या नागपुरातील कार्यालयात धडकले. परंतु, कारवाईचे आधीच संकेत मिळाल्यामुळे कार्यालयाला कुलूप ठोकून येथील संचालक मंडळी आधीच पळून गेले. त्यामुळे अमरावती पोलिसांनी रिकाम्या हाताने नागपुरातून पळून जावे लागले.

मध्य भारतातील हवालाचे सर्वांत मोठे सेंटर नागपूरला आहे. तहसील, लकडगंज, कळमना, नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गांधीबाग, वर्धमाननगर, छापरूनगर, हिवरीनगर, आदी भागातून हवालावाले रोज कोट्यवधींच्या रकमेची हेरफेर करतात. पोलीस, गुन्हेगार आणि आंगडियांना (कुरिअर कंपन्या) त्याची माहिती आहे. मात्र, त्यांना साईडलाईन करून हवालावाले शेकडो कोटींचा व्यवहार बिनबोभाट, बिनदिक्कतपणे पार पाडतात. ते अनेकांना ‘सोनपापडी’ देतात. त्यामुळेदेखील त्यांची माहिती अपवादानेच लिक होते. माहिती लिक झाली तरी ज्या दिवशीची टीप आहे, त्याच दिवशी ‘पार्सल’ जाईल, याची गॅरंटी नसते. त्यामुळे हवालाची रोकड पकडली जाण्याच्या घटना फारच कमी घडतात. रोकड पकडल्यानंतर पोलिसांची दिशाभूल कशी करायची, त्यातही ‘पार्सल बॉय’ एक्सपर्ट असतात. दिशाभूल करणारी माहिती देऊन ते टाईमपास करतात. तेवढ्या वेळेत या मंडळीचे सीए, वकील पोहोचतात अन् आपला लेखाजोखा सादर करून रक्कम सोडवून नेतात. बहुतांश प्रकरणात असे होते. अमरावतीहून मोठे कलेक्शन अन् हवाला होत असल्याची माहिती चार महिन्यांपूर्वी अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंग यांना कळली. तेव्हापासून त्यांनी ‘नागपूर-अमरावती-खामगाव-बुलडाणा-अहमदाबाद रुटवर नजर रोखली होती. मंगळवारी पहाटे त्यांना यश मिळाले. आधी शिवदत्त महेंद्र गोहिल, रामदेव बहादूरसिंह राठोर, वाघेला सिलुजी जोराजी तसेच नरेंद्र दिलीपसिंह गोहिल हे चाैघे, तर नंतर नीलेश भरतभाई पटेल आणि जिग्नेस राजेश गिरीगोसावी हे दोघे असे सहाजण पोलिसांच्या तावडीत सापडले. त्यांच्याकडून पोलिसांनी साडेतीन कोटींची रोकड ताब्यात घेतली. या कारवाईचा बोभाटा अमरावतीपुरता मर्यादित राहिला नाही. ‘हवालाकांड’ झाल्याचे वृत्त नागपूर, मुंबई, अहमदाबादमध्ये पोहोचले. त्यामुळे या मंडळीशी कनेक्टेड असलेल्यांनी धावपळ सुरू केली. चाैकशीचे संकेत मिळाल्याने अनेकजण भूमिगत झाले. पकडलेल्यांनी नागपूर कनेक्शन उघड करताच अमरावती पोलिसांचे पथक मंगळवारी रात्री नागपुरात पोहोचले. त्यांनी आनंदनगर, झिंगाबाई टाकळी येथील मेकटेकच्या ताब्यातील फ्लॅटवर धडक दिली. मात्र, या फ्लॅटमधील मंडळी कुलूप लावून भल्या सकाळीच गायब झाल्याचे पोलिसांना कळले. पहाटेपर्यंत शोधमोहीम राबवूनही काहीच न मिळाल्याने अमरावती पोलीस येथून परत गेले.

---

गुजरातसह मुंबई, नागपुरातीलही

कनेक्टिंग पीपल्स अमरावतीत

अमरावती पोलिसांच्या ताब्यातील ‘पार्सल बॉईज’नी मंगळवारी रात्रीपर्यंत पोलिसांची दिशाभूल केली. त्यानंतर बुधवारी सकाळी ही रोकड सोडवून घेण्यासाठी गुजरात, मुंबई तसेच नागपुरातील काही मंडळी तेथे धडकली. गुजरातवाल्यांना पुढे करून काहींनी पडद्यामागून महत्त्वाची भूमिका वठविल्याची खास सूत्रांची माहिती आहे. ही रोकड मे. मेकटेक कंपनीची असून, आम्ही भाजीपाल्यासह अन्य शेती उत्पादनाचा व्यवहार करतो. त्यातील व्यवहाराचे हे कलेक्शन असल्याचा दावा संबंधितांनी केल्याचे समजते. कोरोनामुळे कलेक्शन थांबले होते. त्यामुळे वसूल झालेल्या रकमेचा आकडा मोठा असल्याचाही ‘युक्तिवाद’ करण्यात आल्याची माहिती आहे.

----

उपराजधानीतील घटनेला उजाळा

२८ एप्रिल २०१८ च्या मध्यरात्री रायपूर (छत्तीसगड) येथून अशाच प्रकारे हवालाचे कोट्यवधी रुपये नागपुरात आले होते. नंदनवन पोलीस ठाण्यात तेव्हा सहायक पोलीस निरीक्षक असलेला सुनील सोनवणे, त्याचा रायटर विलास भाऊराव वाडेकर आणि वाहनचालक पोलीस शिपाई सचिन शिवकरण भजबुजे या तिघांनी दोन टिपर (माहिती देणारे) कुख्यात गुंड हाताशी धरून ही रोकड ताब्यात घेतली आणि त्यातील २ कोटी ५५ लाख रुपये चोरले. उर्वरित रोकड नंदनवन ठाण्यात जमा केली होती. त्यावेळी या घटनेचा बोभाटा झाल्यानंतर सोनवणे, वाडेकर आणि भजबुजे या तिघांना दरोड्याच्या आरोपात अटक करून त्यांनी भिसी गावाजवळ लपवून ठेवलेली रोकड जप्त करण्यात आली होती.

----

Web Title: As soon as the amount of hawala was seized, Nagpurwale went underground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.