बोहल्यावर चढताच नवरी म्हणाली ना !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 11:08 PM2018-02-21T23:08:18+5:302018-02-21T23:15:41+5:30
उमरेडच्या नवरदेवाची वरात लग्नस्थळी पोहचली. वऱ्हाडी वाजतगाजत लग्नमंडपात आले. नवरदेवाचे यथोचित स्वागत झाल्यावर तो लग्नाच्या खुर्चीवरही बसला. एवढ्यात वधूपक्षाची माणसे वधूलाही घेऊन पोहचली. वधूही खुर्चीवर बसली. भंतेजी लग्नविधीला सुरुवात करणार, तेवढ्यात ‘नाही, मला लग्न करायचे नाही’अशी वधू जोरात किंचाळली अन् सारेच अवाक् झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उमरेडच्या नवरदेवाची वरात लग्नस्थळी पोहचली. वऱ्हाडी वाजतगाजत लग्नमंडपात आले. नवरदेवाचे यथोचित स्वागत झाल्यावर तो लग्नाच्या खुर्चीवरही बसला. एवढ्यात वधूपक्षाची माणसे वधूलाही घेऊन पोहचली. वधूही खुर्चीवर बसली. भंतेजी लग्नविधीला सुरुवात करणार, तेवढ्यात ‘नाही, मला लग्न करायचे नाही’अशी वधू जोरात किंचाळली अन् सारेच अवाक् झाले. कामठी रोडवरील मानसी पायल लॉन येथे बुधवारी घडलेला चित्रपटासारखा हा प्रसंग सर्वत्र चर्चेचा विषय ठरला.
झालेल्या प्रकरणाचे सविस्तर वृत्त असे की, उमरेडला राहणारा समीर (नाव बदलले) व नागपूरच्या जरीपटका भागात राहणारी मीरा (नाव बदलले) या दोघांचा विवाह मानसी पायल लॉन येथे आयोजित करण्यात आला होता. ठरल्याप्रमाणे नवरदेवाची वरात सकाळी लग्नस्थळी पोहचली. जानोसावरून नवरदेवाची वरात वाजतगाजत आणि वऱ्हाडी नाचत लग्नमंडपात पोहचली. रीतीप्रमाणे नवरदेवाचे द्वारावर वधूपक्षाकडून स्वागत करण्यात आले व तो बोहल्यावर चढला. यावेळी वधूलाही विवाहस्थळी आणण्यात आले. सर्वत्र उत्साह भरलेल्या वातावरणात भंतेजी विवाहाचा विधी सुरू करणार, त्यापूर्वीच वधू खुर्चीवरून उठली व जोरात ओरडत लग्न करण्यास नकार दिला. अचानक वधूच्या अशा ओरडण्याने लग्नमंडपात उपस्थित वऱ्हाडी अवाक् झाले व सर्वत्र एकच गोंधळ उडाला. वधूचा असा व्यवहार सर्वांनाच समजण्यापलीकडे होता. वधूपक्षाच्या मंडळीने तिला समजावीत लग्नास नकार देण्याचे कारण विचारले असता,‘माझे दुसऱ्या मुलाशी प्रेम आहे’, असे तिने सांगितले. त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. यादरम्यान मुलीच्या नातेवाईकांनी तिला खोलीत डांबून मारहाणही केल्याचे सांगण्यात येत आहे.
झालेल्या प्रकाराची सूचना जरीपटका पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहचले व त्यांनी मुलीला लग्नास नकार देण्याचे कारण विचारले. त्यावेळी मुलीने, आपले अफेअर असून हे लग्न करायला तयार नव्हते, मात्र पालकांच्या दबावातून लग्नास तयार झाल्याचे तिने सांगितले. मुलीच्या उत्तराने पोलिसही हतबल झाले. शेवटी मध्यस्थी करून लग्न तोडण्यास सांगण्यात आले.
घटनाक्रमानंतर वधूपक्षाची मंडळी परत गेली. दरम्यान, वरपक्षाने जरीपटका पोलिसांकडे तक्रार नोंदविल्याची माहिती सांगण्यात येत आहे.
कथित प्रियकरही तयार नाही
दरम्यान, पोलिसांसमोर कबुली देताना वधूने आपले एका युवकाशी प्रेम असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्या कथित प्रियकराला फोन करण्यास सांगितले. फोन लावल्यानंतर त्या प्रियकरानेही मुलीसोबत आपले प्रेमसंबंध नसल्याचे सांगितल्याने पोलिसही चक्रावले. त्या व्यक्तीचा आधीच विवाह झाला असून, संबंधित वधू त्याच्याशी एकतर्फी प्रेम करीत असल्याचे सांगण्यात येत आहे. वरपक्षासाठी हा प्रसंग संतापजनक असला तरी मनोरंजनाचा विषय ठरला होता.