जंगलात मुक्त होताच आनंदाने धावली माकडाची पिले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 10:42 PM2020-10-08T22:42:29+5:302020-10-08T22:43:50+5:30
Baby Monkeys , Forest, Nagpur Newsआईचे छत्र हरविलेली माकडाची पिले वनविभागाच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये वाढली. तिथेच लहानाची मोठी झाली. ती मोठी झाल्यावर जंगलात सोडताच आनंदाने धावत सुटल्याचा आनंददायी अनुभव ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमधील कर्मचाऱ्यांनी घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आईचे छत्र हरविलेली माकडाची पिले वनविभागाच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये वाढली. तिथेच लहानाची मोठी झाली. ती मोठी झाल्यावर जंगलात सोडताच आनंदाने धावत सुटल्याचा आनंददायी अनुभव ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमधील कर्मचाऱ्यांनी घेतला.
काही महिन्यांपूर्वी या सेंटरवर आईपासून विभक्त झालेली, मातृछत्र हरविलेली माकडाची लहान पिले संगोपनासाठी आणली होती. यातील कुणाची आई विजेचा धक्का लागून मरण पावली, तर कुणाची आई अपघातामध्ये दगावली. सेंटरमधील कर्मचाऱ्यांनी त्यांचे पोषण केले. या दरम्यान एक-दोन पिलांचा मृत्यूही झाला. आता ही पिले मोठी झाल्याने त्यांना जंगलात सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या पिलांनी कधीच जंगल, माकडांचा कळप पाहिलेला नव्हता. त्यामुळे ही पिले जंगलातील मोकळ्या वातावरणात राहतील का, इतर माकडे त्यांना आपल्यात स्वीकारतील का, हा प्रश्न होता. तरीही प्रयोग म्हणून त्यातील दोन पिलांना जंगलात सुरक्षितपणे कळपाजवळ सोडण्याचा निर्णय झाला. वन्यजीव सप्ताहात हा प्र्रयोग केला. दुसऱ्या पिलांची आई त्यांना आपल्यात सामावून घेते की नाही, हे पाहणे महत्वाचे होते. त्यासाठी पवनी रेंजमध्ये त्यांना सोडण्याचे ठरले. रेस्क्यूचे वनपाल अनिरुद्ध खड़से व वनरक्षक दिनेश बोरकर यांनी या दोन्ही पिलांना सोडताच जणूकाही त्यांना कैदेत ठेवले होते व आता सुटका झाली या आनंदात ते धूम ठोकत आनंदाने जंगलाच्या दिशेने कळपाकडे पळत सुटले.