‘हाय रिस्क’ रुग्णांच्या ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’साठी एसओपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 09:42 PM2020-09-07T21:42:43+5:302020-09-07T21:44:48+5:30
शहरात कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता चाचण्यांची संख्या आणि वेग वाढावा या उद्देशाने शहरात कोविड चाचणी केंद्रांची संख्या वाढविली. आता ‘हाय रिस्क’ रुग्णांचे प्राधान्याने ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ करून त्यांची तातडीने चाचणी केली जावी, यासाठी ‘स्टॅन्डर ऑपरेटिंग प्रोसिजर’(एसओपी)गठित केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता चाचण्यांची संख्या आणि वेग वाढावा या उद्देशाने शहरात कोविड चाचणी केंद्रांची संख्या वाढविली. आता ‘हाय रिस्क’ रुग्णांचे प्राधान्याने ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ करून त्यांची तातडीने चाचणी केली जावी, यासाठी ‘स्टॅन्डर ऑपरेटिंग प्रोसिजर’(एसओपी)गठित केली आहे. याची जबाबदारी चार आयएएस अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.
एसओपीमध्ये मनीष खत्री, माधवी खोडे, राम मूर्ती व ए.एस.आर. नायक आदींचा समावेश असून ते मनपाच्या दहाझोन मधील ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ वर नियंत्रण ठेवतील. गेल्या आठवड्यापूर्वी नागपूर शहरात दररोज ३५०० ते ३८०० टेस्ट होत होत्या. आता ही संख्या ६ हजारांवर गेली असल्याची माहिती राधाकृष्णन बी. यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
मेयो, मेडिकल येथील व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. मनपाची रुग्णालये सुसज्ज करण्यात आली आहेत. ४०० बेड तयार आहेत. परंतु डॉक्टर व कर्मचारी नसल्याने वॉक इंटरव्ह्यू घेण्याचा निर्णय घेतला. अधिक वेतन दिले जाणार आहे. ३५ जणांनी मुलाखती दिल्या. काही दिवसात या रुग्णालयात उपचार सुरू होतील, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला.
एक हजार टेस्टची क्षमता वाढणार
कोरोनाचे वेळीच निदान व्हावे, यासाठी शक्यतो आरटीपीसीआर टेस्टवर भर दिला जात आहे. या टेस्ट अधिकाधिक वाढाव्यात यासाठी लॅबची क्षमता वाढविली जात आहे. यासाठी आवश्यक साधने व यंत्रसामग्री उपलब्ध केली जाईल. यातून पुन्हा एक हजार टेस्टची क्षमता वाढणार आहे. यामुळे अधिकाधिक लोकांना मोफत टेस्ट करता येतील.
२४ तासात टेस्ट रिपोर्ट
चाचणी करताना योग्य खबरदारी घेतली जात आहे अथवा नाही, निर्धारित वेळेतच चाचणी केली जाते का, टेस्ट रिपोर्ट आधी ४८ व ७२ तासात मिळत होता. यामुळे उपचाराला विलंब होत होता. ही बाब लक्षात घेता आता २४ तासात टेस्ट रिपोर्ट देण्याचे निर्देश दिले असून चाचणी केंद्रांची संख्या ५० पर्यंंत वाढविण्यात आल्याची माहिती राधाकृष्णन बी. यांनी दिली.
निर्देशांचे पालन न झाल्याने बेडची समस्या
कोरोना रुग्णांवर वेळीच उपचार होण्याची गरज आहे. यासाठी गेल्या आठ दिवसात १२०० नवीन बेड उपलब्ध करण्यात आले. दहा दिवसात पुन्हा १००० बेड वाढविले जातील. मनपा प्रशासनाने आधी दिलेल्या निर्देशांचे पालन न झाल्याने बेड न मिळण्याची समस्या निर्माण झाली. ३ हजार ऑक्सिजन व ८५० आयसीयू उपलब्ध आहेत. मनपाच्या नियंत्रण कक्षाला कॉल केल्यास बेड कुठे उपलब्ध आहेत, याची माहिती मिळणार आहे.
अॅम्ब्युलन्स वाढविणार
रुग्णांना बेळीच अॅम्ब्युलन्स उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी आहेत. सध्या ४० अॅम्ब्युलन्स उपलब्ध आहेत. आठ दिवसात पुन्हा २५ अॅम्ब्युलन्स उपलब्ध होतील. प्रत्येक झोनला चार अॅम्ब्युलन्स राहतील अशी व्यवस्था केली जात आहे.