ज्वारीची श्रीमंती वाढली; गव्हापेक्षाही जास्त भाव !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:10 AM2021-07-14T04:10:26+5:302021-07-14T04:10:26+5:30
नागपूर : ज्वारी हे प्रामुख्याने महाराष्ट्राचे धान्य आहे. गरिबाचे अन्न म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्वारीला कोरोनानंतर सोन्याचे दिवस आले आहेत. ...
नागपूर : ज्वारी हे प्रामुख्याने महाराष्ट्राचे धान्य आहे. गरिबाचे अन्न म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्वारीला कोरोनानंतर सोन्याचे दिवस आले आहेत. पूर्वी गहू महाग असल्याने चपात्या खाणे हे संपन्न घराचे लक्षण होते. मात्र, हळूहळू शेतकऱ्यांनी नगदी पिकांचे प्रमाण वाढविल्याने साहजिकच ज्वारीचे उत्पादन कमी झाले. पण ज्वारीने आता श्रीमंतांची मक्तेदारी समजल्या जाणाऱ्या गव्हालाही मागे टाकले आहे. शास्त्रीयदृष्ट्या ज्वारीचे खूपच महत्त्व असून, हृदयरोग, मधुमेह आणि स्थुलता टाळण्यासाठी ज्वारी खाण्याकडे कल आहे. यामुळे ज्वारीची मागणी वाढल्याने दरही वाढले आहेत. दादर ज्वारीची सध्या ५० रुपये आणि एमपी बोट गव्हाचे भाव ३६ रुपये किलो आहेत.
शहरात आरोग्याबाबत सजग नागरिकांमध्ये ज्वारीच्या पोषण मूल्यांबाबत जागृती झाल्याने ज्वारीच्या सेवनाचे प्रमाण वाढले. लोकांकडून आहारात प्रामुख्याने बाजारी, ज्वारी, गहू या धान्याचा जास्त उपयोग होतो. काहीजण नाचणी मका यालाही स्वयंपाकघरात स्थान देतात. ३० वर्षांपूर्वी ज्वारीला आहारात जास्त महत्त्व होते. ग्रामीण भागात गहू सणाला व पाहुणे आले की वापरला जात होता. पण गेल्या काही वर्षांत ज्वारीपेक्षा गव्हाचे उत्पादन वाढले आहे. त्यामुळे गव्हाचा दर कमी झाला आहे. विदर्भात ज्वारीचे उत्पादन मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत फारच कमी आहे. डॉक्टर ज्वारी आरोग्यासाठी चांगली असल्याचे सांगत असल्याने आहारात गव्हापेक्षा ज्वारीला प्राधान्य मिळत आहे. हॉटेल, खानावळी, रिसॉर्ट आदी ठिकाणीही ज्वारीच्या भाकरीला पसंती मिळत आहे. याशिवाय ज्वारीपासून तयार होणाऱ्या पदार्थांनाही मागणी आहे. भाकरी रोज खाणाऱ्यांची संख्याही वाढली असली तरीही आता शहरी आणि ग्रामीण भागात नागरिक गव्हाच्या चपातीला जास्त पसंती आहे. त्यामुळे तुम्ही ज्वारीची भाकरी खात नसाल तर आहारात ज्वारीच्या भाकरीचा नक्की समावेश करा, असे आहारतज्ज्ञ सांगत आहेत.
अशी वाढली ज्वारीची श्रीमंती (प्रती क्विंटल दर) (ग्राफ)
वर्षज्वारीगहू
१९८० ४००-४५०६००-८२५
१९९० ८००-१०००१०००-१३००
२००० १२००-१४००१५००-१८००
२०१० १४००-१६००१८००-२२००
२०२० २०००-२५००२२००-२८००
२०२१ २०००-३२००१८००-३०००
भाकरीच परवडायची म्हणून खायचो...
पूर्वी गव्हाचे दर जास्त होते. ज्वारी पचायला हलकी आणि दरही कमी होते. शेतात ज्वारीचे पीक असायचे. त्यामुळे घरी ज्वारी मुबलक प्रमाणात राहायची. जेवणात ज्वारीची भाकरी असल्याने तब्येत चांगली राहते.
पांडुरंग सोनार
ज्वारीची भाकर शरीरासाठी सर्वोत्तम खाद्य आहे. गव्हाची मुबलकता असल्यानंतरही आठवड्यात तीनदा ज्वारीची भाकर खातोच. पूर्वी नैसर्गिक ज्वारी स्वस्त होती. ज्वारीची भाकरी खाल्यास भूक जास्त लागते.
सेवक देवरे.
आता चपातीच परवडते...
चुलीवर तयार होणाऱ्या भाकरीची चव वेगळीच असते. आता नैसर्गिक दर्जाची ज्वारी बाजारात मिळत नाही, शिवाय पूर्वीसारखी भाकरी तयार होत नाहीत. दर्जेदार ज्वारीचे दर वाढले आहेत. फ्लॅट संस्कृतीमुळे घरोघरी चपातीला जास्त पसंती आहे. भाकरी आताही आवडीने खातो.
शशिकांत समर्थ
घरी ज्वारीची भाकरी कमी आणि गव्हाच्या चपातीवर जास्त भर आहे. एकप्रकारे सवयच झाली आहे. भाकरी रोज तयार करणे शक्य नाही, पण असली की जेवणाची चव वेगळी असते. चांगली ज्वारी महाग आहे. गुणकारी असल्याने ज्वारीची भाकरी खाण्यास जास्त पसंती आहे.
रविकांत हरडे
आरोग्याची श्रीमंती ज्वारीतच
सर्वाधिक पोषणमूल्यांमुळे ज्वारीची मागणी वाढली आहे. गव्हात ग्लूटामिनचे प्रमाण जास्त असल्याने पोटाच्या तक्रारी वाढत आहेत. जडपणा, पचन न होणे, चिकटपणा यामुळे गव्हापेक्षा ज्वारीची भाकरी खाणे केव्हाही चांगली. ज्वारीत प्रथिने, खनिजांचे प्रमाण भरपूर आहे. तसेच तंतूमय पदार्थही जास्त असल्याने पचण्यास हलकी आहे. मधुमेह, स्थूलता, हृदयरोग टाळण्यासाठी ज्वारीचे सेवन गुणकारी ठरते. फायटो केमिकल्समुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो. निअॅक्सिनमुळे कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रणात राहते. पोटॅशिअम, मॅग्नेशिअम व मिनरल्समुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यात ज्वारीची मदत होते.
संध्या कापसे, आहारतज्ज्ञ
जिल्ह्यात ज्वारीचे उत्पादन घटले
नागपूर जिल्ह्यात खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात ज्वारीचे उत्पादन घेतले जायचे. पण त्याची जागा आता सोयाबीन आणि कापसाने घेतली आहे. जिल्ह्यात ज्वारीचे क्षेत्र व उत्पादन टिकून राहिल्याचे दिसून येत नाही. भाव चांगला मिळत असल्याने जिल्ह्यात काही शेतकरी अजूनही नैसर्गिक ज्वारीचे उत्पादन थोड्या फार प्रमाणात घेतात. ज्वारीचा दाणा भरला नसल्यास भाव कमी मिळतो. त्याकरिता जास्त मशागत करावी लागते. विक्री कमी आणि घरीच खाण्यावर शेतकऱ्यांचा जास्त भर असतो. नागपूर जिल्ह्यात अन्य जिल्ह्यातील ज्वारी विक्रीला येते.
असे झाले उत्पादन (टन)
२०१७ १२०६
२०१८ ११८९
२०१९ ८३१
२०२० १०५०
२०२१ ५६३ (ख.)