स्मशानभूमीला सोसवेना दाह शेकोट्यांचा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:07 AM2021-04-06T04:07:11+5:302021-04-06T04:07:11+5:30
- स्मशानघाट झाले फुल्ल : पेटत्या प्रेतांना साथ प्रतीक्षेत असलेल्या प्रेतांची लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मृत्यूदेवतेलाही वेदना व्हाव्या, ...
- स्मशानघाट झाले फुल्ल : पेटत्या प्रेतांना साथ प्रतीक्षेत असलेल्या प्रेतांची
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मृत्यूदेवतेलाही वेदना व्हाव्या, अशी स्थिती कोरोना संक्रमणाने निर्माण केली आहे. स्मशानभूमीत येणाऱ्या कोरोना संक्रमित मृतांच्या प्रेतांची अनिर्बंध संख्या बघून मृत्यूचा तांडव कसा असेल, याचा अनुभव घेता येईल. इहलोकीचा हा अंतिम प्रवास सुखकर व्हावा, यासाठी प्रत्येक धर्म-पंथीय आपापले विधिविधान करतात. मात्र, कोरोनाने हे सगळे विधिविधान हद्दपार झालेले आहेत. आप्त-परके हा फरकच नाही. प्रेतांची विल्हेवाट लावावी कशी, हाच प्रश्न उरला आहे. अंत्यसंस्कार म्हणून पेटवली जाणारी प्रेते बघून स्मशानभूमीला या शेकोट्यांचा दाह सोसवत तरी असेल का, असा ब्रह्मानंदी प्रश्न उपस्थित व्हायला लागला आहे.
सप्टेंबर २०२०चा काळ आठवला की, अजूनही अंगावर शहारे उत्पन्न होतात. कोरोना संक्रमणाचा तो उच्चतम काळ आणि मृत्यूंची संख्याही दररोज ६५च्या वरची. सोबतीला नैसर्गिक मृत्यूंची वेगळी संख्या. स्मशानघाटांवर जणू ज्वालामुखीचा उद्रेक झाला की काय, अशी स्थिती त्या काळात दररोजची होती. त्यानंतर मार्च २०२१ पासून अशाच स्थितीचा अनुभव दररोज घेता येत आहे. एप्रिलच्या पहिल्या पाच दिवसांची स्थिती तर सप्टेंबर २०२०पेक्षाही भयंकर अशीच दिसून येत आहे. स्थिती एवढी बिकट बनली आहे की, कोणते प्रेत कोरोना संक्रमित आणि काेणते प्रेत नैसर्गिक मृत्यूचे, हे सांगणे कठीण झाले आहे. अंत्ययात्रेतही सहभागी व्हायला लोक धजावत नाहीत. स्मशानघाटातील प्रत्येक ओट्यावर दोन प्रेत जळत आहेत आणि उर्वरित दोन-तीन प्रेतं अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत आहेत. सर्वत्र २४-२४ तास शेकोट्या पेटलेल्याच अवस्थेत आहेत. एकाही ओट्याला क्षणभराची उसंत नाही. ॲम्बुलन्स संक्रमितांचे प्रेत घेऊन येते आणि स्मशानभूमीत सोडून जाते. बऱ्याचदा तर ॲम्बुलन्सलाही स्मशानघाटाच्या आत जाण्यासाठी वाट बघावी लागते, अशी भयंकर स्थिती सध्या शहराची झालेली आहे.
----
शहरात १३ स्मशानघाट
शहरात १३ ते १५ ठिकाणी सार्वजनिक स्मशानभूमी आहे. काही स्मशानभूमी वेगवेगळ्या धर्मीयांसाठी राखीव आहेत. काही निर्मितीअवस्थेत आहेत. कोरोना संक्रमितांच्या प्रेतांची विल्हेवाट सार्वजनिक स्मशानभूमीतच लावली जात आहे. गंगाबाई घाट, मानेवाडा घाट, मोक्षधाम घाट, अंबाझरी, मानकापूर, वैशालीनगर घाट हे स्मशानघाट मोठे आहेत. गंगाबाई आणि मानेवाडा घाट तुलनेने सगळ्यात मोठे आहेत. या स्मशानभूमीत डिझेल, विद्युत शवदाहिनीही आहेत. काही घाटांवर प्रेत जाळण्यासाठी ३० ओटे आहेत. प्रत्येक ओट्यावर दोन प्रेत जाळली जातात. असे असतानाही अनेक प्रेतांना अंत्यसंस्कारासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.
-------
मृत्यूचे विदारक चित्र
१ एप्रिल - ६०
२ एप्रिल - ६०
३ एप्रिल - ४७
४ एप्रिल - ६२
याशिवाय दररोज नैसर्गिक मृत्यूंचे आकडे ६० ते ७०च्या घरात असतात. कोरोना संक्रमणामुळे स्मशानघाटांवर दररोज १२० ते १५० प्रेतांचे अंत्यसंस्कार व्हायला लागले आहेत. वेटिंग लिस्टमुळे अनेक प्रेतांची विल्हेवाट दुसऱ्या दिवसापर्यंत होत असते. ४ एप्रिलपर्यंत नागपूर जिल्ह्यात कोरोना संक्रमणामुळे ५,२६५ नागरिकांचा मृत्यू झालेला आहे.
----------------
मृत्यूच्या प्रमाणपत्रासाठी वाढलीय गर्दी
महापालिकेच्या दहाही झोनमध्ये जन्म-मृत्यू विभागात मृत्यूचा दाखला मागणाऱ्यांची गर्दी वाढली आहे. स्मशानघाटांवर अंत्यसंस्कार केल्यानंतर घाटांवरील पर्यवेक्षकांकडून मृताची संपूर्ण माहिती भरून घेतली जाते. दुसऱ्या दिवशी ती माहिती महापालिकेकडे पाठविली जाते. दुसऱ्या-तिसऱ्या दिवसापासून मृत्यूचे प्रमाणपत्र उपलब्ध होत असते. मात्र, दररोजच्या वाढत्या मृत्यूंच्या आकड्यामुळे विलंब होत असल्याचे दिसून येत आहे.
.....................