ते चिमुकले पुन्हा ऐकू शकणार आवाज
By सुमेध वाघमार | Published: July 5, 2024 06:06 PM2024-07-05T18:06:58+5:302024-07-05T18:07:52+5:30
मेयोचा पुढाकार : राज्यात पहिल्यांदाच कॉक्लीअर इम्प्लांट दुरुस्ती
सुमेध वाघमारे
नागपूर : जन्मजात श्रवणदोष असलेल्या चिमुकल्यांसाठी कॉक्लअीर इम्प्लांट नि:शुल्क उपलब्ध करून दिले जात असलेतरी ते नादुरुस्त झाल्यास त्याच्या दुरुस्तीसाठी कोणत्याही उपाययोजना नव्हत्या. परिणामी, अनेकांना पुन्हा बहिरेपणाला सामोर जावे लागायचे. याची दखल मेयोचे अधिष्ठाता डॉ. रवी चव्हाण यांनी घेतली. त्यांनी पाठविलेल्या यंत्र दुरुस्तीचा प्रस्तावाला नुकतीच शासनाने मंजुरी दिली. यामुळे हे रुग्ण पुन्हा आवाज ऐकू शकणार आहेत. राज्यातील हा पहिलाच उपक्रम आहे.
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) कान, नाक व घसा विभागाचे प्रमुख डॉ. जीवन वेदी यांनी आतापर्यंत १०१ कॉक्लीअर इम्प्लांट केले. मेडिकलमध्येही १००वर याच्या शस्त्रक्रिया झाल्या. मेयोमध्ये २०१७पासून या शस्त्रक्रिया सुरू आहेत. हे यंत्र महागडे असल्याने शासन गरजू रुग्णांना नि:शुल्क उपलब्ध करून देते. पाच वर्षांपर्यंतच्या मुला-मुलींमध्ये या यंत्राचे रोपण केले जाते. परंतु खेळताना किंवा एखाद्या घटनेमुळे यंत्र नादुरुस्त होत असल्याने या चिमुकल्यांना पुन्हा बिहरेपणाला सामोर जावे लागत होते. यंत्राचा दुरुस्तीचा खर्चही सामान्यांना परडवणारा नाही. काही त्रस्त पालकांनी मेयो प्रशासनाला मदत करण्याची विनंती केली. याची दखल घेत अधिष्ठाता डॉ. चव्हाण घेऊन प्रस्ताव तयार केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेटून त्यांनी या विषयीची माहिती दिली. त्यांनी लागलीच निधी उपलब्ध करून देण्याचा सूचना केल्या. त्यानुसार जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी खनीकर्म विभागातून १५ लाखांचा निधी मंजुर केला. यामुळे लवकरच नादुरुस्त कॉक्लीअर इम्प्लांट दुरूस्त होऊन चिमुकल्यांचे आयुष्य सुकर होणार आहे.
गरजूंनी समितीकडे द्यावा प्रस्ताव
यंत्र दुरुस्तीला मंजुरी देण्यासाठी एक समिती तयार केली आहे. यात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, मेयोचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नितीन शिंदे, इएनटी विभागाचे प्रमुख डॉ. जीवन वेदी, सहयोगी प्राध्यापक डॉ. विपीन इखार व आॅडीओलॉजिस्ट डॉ. मृगा वैद्य यांचा समावेश आहे. नागपूर जिल्ह्यातील ज्या रुग्णांचे कॉक्लीअर इम्प्लांट नादुरुस्त आहे त्यांनी या समितीकडे दुरुस्तीचा प्रस्ताव द्यावा. त्यांच्या मंजुरीनंतर यंत्र दुरुस्तीसाठी निधी दिला जाईल. याचा लाभ संबंधितांनी घ्यावा.
-डॉ. रवी चव्हाण, अधिष्ठाता मेयो