तज्ज्ञ चित्रकारांच्या चित्रांची रसिकांना मोहिनी
By admin | Published: August 3, 2014 12:58 AM2014-08-03T00:58:20+5:302014-08-03T00:58:20+5:30
मुंडले एज्युकेशन ट्रस्टच्या सेंट्रल इंडिया स्कूल आॅफ फाईन आर्ट्स( सिस्फा ) च्यावतीने नुकतेच एका प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. आपल्या कला निर्मितीच्या १० व्या वर्षात पदार्पण केल्यानिमित्त
दशकाविष्कार कलाप्रदर्शनाचे उद्घाटन : सिस्फाचा १० वा वर्धापन दिन
नागपूर : मुंडले एज्युकेशन ट्रस्टच्या सेंट्रल इंडिया स्कूल आॅफ फाईन आर्ट्स( सिस्फा ) च्यावतीने नुकतेच एका प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. आपल्या कला निर्मितीच्या १० व्या वर्षात पदार्पण केल्यानिमित्त या प्रदर्शनचे आयोजन सिस्फाने केले आहे. संस्थेचे हे १० वे वर्ष त्यांच्या विविध कला उपक्रमाने साजरे केले जाणार आहे. या काळात सिस्फाने विविध कलाप्रकारांची गोडी जनमानसात आणि कलारसिकात रुजविली. लक्ष्मीनगरातील सिस्फा गॅलरी कला उपक्रमासाठी नागपूरचे कलामाहेर म्हणून मान्यता पावलेले आहे. अनेक राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय कलाकारांच्या कलाकृतीनी या दालनाच्या भिंती आतापर्यंत सजल्या आहेत.
सिस्फाच्या प्राध्यापकवृंदाने त्यांच्या नवीन कलाकृती ‘दशकाविष्कार’ या मथळयाखाली सिस्फा गॅलरीत प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. सिस्फाच्या बी. एफ. ए आणि एम. एफ. ए. साठी चित्र, शिल्प, ग्रॉफिक्स, उपयोजित कला आणि त्याच्या उपशाखांचा प्राध्यापक वर्ग यांनी आपल्या दर्जेदार कलाकृती या दशकाविष्कारमध्ये प्रदर्शित केल्या आहेत.
सिस्फाच्या आजी व माजी प्राध्यापकांचे हे कला प्रदर्शन असून यात प्रमोदबाबू रामटेके, प्रकाश कावळे, शशिकांत रेवडे, भाऊ दांदळे, प्रशांत फिरंगी, बाबर शरीफ, अधिष्ठाता चंद्रकांत चन्ने, रविप्रकाश सिंग, पंकज दवंडे, अक्षय तिजारे, ज्योती हेजीब आणि रचना दीक्षित यांच्या कलाकृती आहेत. विविध कल्पना, विविध पद्धती, विविध विचारांची निर्मिती कॅनव्हास आणि इतर माध्यमातून झाली आहे. एकाच वेळी इतके कलाप्रकार म्हणजे रसिकांना मेजवानीच ठरणार आहे. प्रदर्शनात एकूण ३० कलाकृती प्रदर्शित करण्यात आल्या आहेत.
१ आॅगस्ट रोजी सायंकाळी प्रभाकरराव मुंडले यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. सिस्फाचे अधिष्ठाता चंद्रकांत चन्ने यांनी रसिकांचे आभार मानून सिस्फा आणि सिस्फाची छोटी गॅलरी त्यांच्या प्रेमामुळेच मोठी होऊ शकली, असे उद्गार काढले. कार्यक्रमाचे संचालन मंगेश बावसे यांनी केले. लक्ष्मीनगरातील सिस्फाच्या छोट्या गॅलरीत हे प्रदर्शन ४ आॅगस्टपर्यंत कलारसिकांसाठी खुले असून कलारसिकांनी या कलाप्रकारांचा आनंद घ्यावा, असे आवाहन चंद्रकांत चन्ने यांनी केले आहे. (प्रतिनिधी)