बियाण्यांची उगवणक्षमता तपासल्यानंतरच पेरणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:06 AM2021-06-03T04:06:45+5:302021-06-03T04:06:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आगामी खरीप हंगामात पेरणी करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी बियाण्यांची उगवण क्षमता तपासल्यानंतरच प्रत्यक्ष पेरणी करावी, असे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आगामी खरीप हंगामात पेरणी करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी बियाण्यांची उगवण क्षमता तपासल्यानंतरच प्रत्यक्ष पेरणी करावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी केले आहे.
खरीप हंगाम नियोजन तसेच खते व बियाण्यांच्या उपलब्धतेबाबतचा विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी बुधवारी आढावा घेतला. विभागात खरीप हंगामात १९.३५ लाख हेक्टर क्षेत्रावर नियोजन करण्यात आले असून, शासनाने यावर्षी कमी दिवसाच्या पीक पद्धतीचा अवलंब करण्यासंदर्भात आवाहन केले आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना मागणीनुसार बियाण्यांची उपलब्धता करण्यासंदर्भात यावेळी निर्देश देण्यात आले.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात नागपूर विभागातील खरीप आढावा घेण्यात आला. यावेळी विभागातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. यावेळी महसूल उपायुक्त मिलिंद साळवे, सामान्य उपायुक्त श्रीकांत फडके, सिंचन विभागाचे मुख्य अभियंता उत्तम पवार, अधीक्षक अभियंता ज.ग. गवळी, कृषी सहसंचालक प्रज्ञा गोडघाटे तसेच विविध विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते.
खरीपासाठी ४ लाख ३२ हजार हेक्टर नियोजन
जलसंपदा विभागातर्फे खरीप हंगामासाठी ४ लाख २९ हजार १७७ हेक्टरचे क्षेत्र निर्धारित करण्यात आले आहे. मागील वर्षी ३ लाख ३० हजार ३०६ हेक्टर खरीप क्षेत्राला सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याला प्राधान्य असल्याची माहिती लाभक्षेत्र विकास प्राधिकरणचे प्रशासक तथा अधीक्षक अभियंता ज.ग. गवळी यांनी दिली. यावर्षी खरीपासाठी ४ लाख ३२ हजार ५५ हेक्टरचे नियोजन करण्यात आले आहे.