पेरणी आटाेपली, पीककर्जाची प्रतीक्षा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:07 AM2021-06-22T04:07:20+5:302021-06-22T04:07:20+5:30
राम वाघमारे लाेकमत न्यूज नेटवर्क नांद : पीककर्ज पेरणीपूर्वी मिळणे अपेक्षित असताना यावर्षी ७५ टक्के पेरणी आटाेपल्यानंतरही काही ...
राम वाघमारे
लाेकमत न्यूज नेटवर्क
नांद : पीककर्ज पेरणीपूर्वी मिळणे अपेक्षित असताना यावर्षी ७५ टक्के पेरणी आटाेपल्यानंतरही काही शेतकऱ्यांना अद्यापही पीककर्जाचे वाटप करण्यात आले नाही. त्यामुळे शेतकरी नांद (ता. भिवापूर) येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेचे उंबरठे झिजवित आहेत तर या बँकेतील अधिकारी व कर्मचारी पर्यायी व्यवस्था न करता दीर्घ रजेवर गेले आहेत. ज्या अधिकाऱ्याकडे प्रभार साेपविण्यात आला, त्या अधिकाऱ्याने आठवड्यातून केवळ दाेन दिवस बँकेत हजेरी लावली आहे.
महाराष्ट्र बँकेच्या नांद शाखेने एप्रिलपासूनच खरीप हंगाम पीककर्ज वाटपाला सुरुवात केली हाेती. या शाखेतून आजवर ३९६ शेतकऱ्यांनी पीककर्जाची उचल केली आहे. खरीप हंगाम सुरू हाेताच या बँकेचे शाखा व्यवस्थापक एक महिन्याच्या वैद्यकीय रजेवर गेले. त्यांचा प्रभार दुसऱ्या अधिकाऱ्याकडे साेपविण्यात आला. प्रभारी अधिकाऱ्याने बँकेचे दैनंदिन व्यवहार करण्याशिवाय दुसरे काेणतेही काम केले नाही. आठवडाभरापासून पीककर्जाच्या खात्यांचे नूतनीकरण व नवीन पीककर्जाला मंजुरीची प्रक्रिया पूर्णपणे थांबली आहे. आपल्याला नवीन पीककर्ज मंजुरी व नूतनीकरण करण्याचे अधिकार नसल्याचे प्रभारी शाखा व्यवस्थापक सांगतात.
वीककर्ज वेळेवर न मिळाल्याने काही शेतकऱ्यांनी दागिने गहाण ठेवून तर काहींनी उसनवार करून पैसा गाेळा करीत पेरणी आटाेपली. काही शेतकऱ्यांनी तर पीककर्जाचे नूतनीकरण हाेणार नाही, असे समजून सावकारांकडून माेठ्या व्याजदराने कर्ज घेतले आहे. काहींनी पीककर्जाचे नूतनीकरण वेळेवर हाेणार या आशेने सावकार व इतरांकडून रकमेची उचल करीत कर्जाची परतफेड केली. त्यांना कर्ज मिळण्यास दिरंगाई हाेत असल्याने सावकारांनी त्यांच्याकडे कर्जवसुलीचा तगादा लावला आहे.
...
कर्जाचे ५० अर्ज प्रलंबित
बँक ऑफ महाराष्ट्रच्या नांद शाखेला परिसरातील १४ गावे जाेडली आहेत. या सर्व गावांमधील दरवर्षी सरासरी १,२०० शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीककर्जाचे वाटप केले जाते. या शाखेने आजवर ३९६ शेतकऱ्यांना पीककर्ज दिले आहे. आठवडाभरात या बँकेकडे २० शेतकऱ्यांना नवीन कर्जवाटप करावयाचे असून, ३० शेतकऱ्यांच्या कर्ज खात्याचे नूतनीकरण करावयाचे आहे. ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यासाठी बँकेच्या मुख्य कार्यालयानेही पर्यायी व्यवस्था केली नाही.
...
... थांबा, व्यवस्था करू
यासंदर्भात बँक ऑफ महाराष्ट्रच्या नागपूर येथील मुख्य कार्यालयातील कर्ज वितरण विभागाच्या प्रबंधकांना विचारणा केली असता, ‘बँक व्यवस्थापक सुटीवर गेल्याने हा प्रकार घडला आहे. तुम्ही आठ दिवस थांबा. आम्ही काहीतरी व्यवस्था करताे.’ असे माेघम उत्तर त्यांनी दिले. पेरणीसाठी एक एक दिवस महत्त्वाचा असताना बँक अधिकारी आठ दिवस सांगण्याची सूचना करतात. हे कितपत याेग्य आहे? प्रभारी व्यवस्थापकांना अधिकार नसतील तर त्यांचा उपयाेग काय? असा प्रश्नही शेतकऱ्यांनी उपस्थित केला.
..
===Photopath===
210621\img_20210621_141159.jpg
===Caption===
बँक ऑफ महाराष्ट्र चा फोटो
शाखा प्रबंधक नसल्याने शेतकरी पिक कर्जासाठी प्रतीक्षेत बसला आहे