पेरणी फसली अन् पिकांवर नांगरणी केली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:07 AM2021-07-08T04:07:59+5:302021-07-08T04:07:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : एक नव्हे दोनदा सोयाबीनची पेरणी फसल्याचा प्रकार उमरेड तालुक्यात अनेक शेतकऱ्यांच्या शेतात बघावयास मिळाला. ...

Sowing crops and plowing on crops | पेरणी फसली अन् पिकांवर नांगरणी केली

पेरणी फसली अन् पिकांवर नांगरणी केली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : एक नव्हे दोनदा सोयाबीनची पेरणी फसल्याचा प्रकार उमरेड तालुक्यात अनेक शेतकऱ्यांच्या शेतात बघावयास मिळाला. काहींची अर्धा-एक एकरात तर काहींची दोन एकरात मोड झाली. अनेकांचा संपूर्ण पेराच उद्‌ध्वस्त झाला. उमरेड तालुक्यातील आंबोली येथील शेतकरी प्रशांत देवगडे यांची दोन एकरातील सोयाबीनची पेरणी दोनदा फसली. अखेरीस बुधवारी त्यांनी या पिकांवर नांगरणी केली. निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा अनेक शेतकऱ्यांना हा फटका सोसावा लागला. अनेकांना दुबार पेरणी वा नांगरणी करीत कापूस, भाजीपाला पिकांना जागा द्यावी लागली.

उमरेड तालुक्यात खरीपाचे एकूण क्षेत्र ४४,०९० हेक्टर आहे. यापैकी १७,१३४ हेक्टर क्षेत्रात सोयाबीन आहे. कापूस २०,८६३ हेक्टर क्षेत्रात तसेच तूर २,४५० हेक्टर क्षेत्रात तर भाताचे १,८०० हेक्टर क्षेत्रात नियोजन आहे. मिरची, भाजीपाला आदी पिकांकडेसुद्धा शेतकऱ्यांचा कल दिसून येतो. यावेळेस सोयाबीन बियाणांमध्ये फारसा दोष दिसून आला नाही. अनेकांनी उगवणक्षमता तपासल्याने आणि कृषी विभागानेही मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयोजन सातत्याने केल्याने शेतकऱ्यांसाठी ते फायद्याचे ठरले, असे मत तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे यांनी व्यक्त केले.

दुबार पेरणी, मोड याबाबतच्या किती तक्रारी आपणाकडे आल्या, असा प्रश्न संजय वाकडे यांना विचारला असता, सध्या एकाही शेतकऱ्याची तक्रार आमच्याकडे आलेली नाही, असे त्यांनी सांगितले. काही प्रमाणात मोड झाल्याचे त्यांनी मान्य केले. नैसर्गिक अडचणींमुळे हे झाले, असेही त्यांनी सांगितले.

---------

...तर होईल पंचाईत

उमरेड तालुक्यात यापूर्वी बऱ्याच दिवसाच्या विलंबानंतर २ जुलै रोजी उमरेड, सिर्सी परिसरात बऱ्यापैकी तर पाचगाव, बेला, हेवती, मकरधोकडा सर्कलमध्ये तुरळक पाऊस झाला. त्यानंतर पुन्हा पावसाने पाठ फिरविली. आतापर्यंत तालुक्यात २३९.९३ मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. आता काही दिवसापासून पावसाने पुन्हा दडी मारली. पाऊस बऱ्यापैकी झाला असला तरी पाऊस लांबला. आता अधिक दिवसाचा खंड पडला तर पिके धोक्यात येऊ शकतात. अनेकांची पंचाईत होईल, अशी भीती व्यक्त होत आहे.

----

फोटो : उमरेड तालुक्यातील आंबोली येथील शेतकऱ्याने सोयाबीनवर नांगरणी केली.

Web Title: Sowing crops and plowing on crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.