सोय वऱ्हाडींची, गैरसोय विद्यार्थ्यांची

By admin | Published: January 22, 2016 03:18 AM2016-01-22T03:18:45+5:302016-01-22T03:18:45+5:30

राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ सांस्कृतिक युवा महोत्सवाच्या आयोजनाचा यंदा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर

Soy weddings, inconvenient students | सोय वऱ्हाडींची, गैरसोय विद्यार्थ्यांची

सोय वऱ्हाडींची, गैरसोय विद्यार्थ्यांची

Next

‘इंद्रधनुष्य’चे आज होणार उद्घाटन : खोल्यांसाठी कुडकुडत प्रतीक्षा, ब्लँकेट्ससाठी पायपीट
नागपूर : राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ सांस्कृतिक युवा महोत्सवाच्या आयोजनाचा यंदा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला मान मिळाला आहे. ‘नॅक’तर्फे ‘अ’ दर्जा मिळालेले विद्यापीठ असल्याने राज्यभरातील विविध विद्यापीठांतून येणाऱ्या विद्यार्थ्यांची चांगली सोय होईल, असे अपेक्षित होते. परंतु विद्यार्थ्यांचा मात्र भ्रमनिरास झाला. अनेक विद्यार्थ्यांना बोचऱ्या थंडीत खोल्या मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागली तर सायंकाळी उशिरा गादी व ब्लँकेट्ससाठी विद्यार्थ्यांची पायपीट सुरू असल्याचे दृश्य पहायला मिळाले. या असुविधेबाबत अनेक विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली.
‘इंद्रधनुष्य’चे शुक्रवार २२ जानेवारी रोजी उद्घाटन होणार आहे. या सांस्कृतिक महोत्सवासाठी राज्यभरातील विद्यापीठांतील विद्यार्थी येथे विविध स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहेत. बाहेरील विद्यापीठांतील विद्यार्थी येण्यास गुरुवार दुपारपासूनच सुरुवात झाली. या विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था आमदार निवासात करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची असुविधा होऊ नये यासाठी रेल्वेस्थानकावरून ‘पिक अप’ची सोयदेखील करण्यात आली होती. काही कनिष्ठ कर्मचारी आमदार निवासात नोंदणीसाठी उपस्थितदेखील होते. परंतु आमदार निवास प्रशासनासोबत विद्यापीठातील ज्येष्ठ अधिकाऱ्यांचा समन्वय नसल्याचे दिसून आले.
गुरुवारी आमदार निवासातील प्रांगणात लग्नाच्या ‘रिसेप्शन’चे आयोजन करण्यात आले होते. यासाठी काही खोल्या लग्नातील वऱ्हाड्यांना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे दुपारी आलेल्या अकोला विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांची सोय तात्पुरती दुसऱ्या खोल्यांमध्ये करण्यात आली. रात्री खोल्या बदलून मिळतील, असे त्यांना सांगण्यात आले. मुंबई येथील ‘एसएनडीटी’ विद्यापीठाच्या विद्यार्थिनी गुरुवारी सायंकाळी पोहोचल्या. परंतु खोल्यांची सोय व्हायची असल्यामुळे या मुलींना सामानासह सुमारे पाऊण तास बोचऱ्या थंडीत बाहेरच बसावे लागले. दापोली येथील डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची चमू दुपारच्या सुमारास आमदार निवासात पोहोचली. परंतु सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत विद्यार्थ्यांच्या खाण्यापिण्याची सोय झालेली नव्हती. काही विद्यार्थ्यांनी खिशातील पैसे खर्च करून पोटपूजा केली. सायंकाळी विद्यार्थ्यांच्या जेवणाची व्यवस्था झाली.

थंडीत विद्यार्थ्यांचे भागम्भाग !
४नागपुरात या आठवड्यात थंडीचा जोर वाढला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पांघरुणाच्या सोयीची विचारणा केली. परंतु अनेक विद्यापीठातील विद्यार्थी दुपारपासून येऊनदेखील त्यांना गाद्या, ब्लँकेट्स पुरविण्यात आले नव्हते. प्रवासामुळे थकलेले अनेक विद्यार्थी तसेच झोपी गेले. सायंकाळी अखेर विद्यापीठातील अधिकाऱ्यांना ही बाब कळल्यानंतर संबंधित सोय करण्यात आली. परंतु या गाद्या, ब्लँकेट्सदेखील विद्यार्थ्यांनाच उचलून न्यावे लागले. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ तसेच मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी यासंदर्भात नाराजी व्यक्त केली.

विद्यापीठाचा दावा, ‘आॅल इज वेल’
विद्यापीठाचे माध्यम समन्वयक डॉ.श्याम धोंड यांना विचारणा केली असता विद्यापीठाने सर्व व्यवस्था चोख ठेवली असल्याचा त्यांनी दावा केला. गुरुवारी सायंकाळपर्यंत ११ विद्यापीठांच्या चमू पोहोचल्या होत्या. लग्नसमारंभासाठी खोल्यांचे ‘बुकिंग’ अगोदरपासून झाल्यामुळे काही खोल्या लगेच मिळाल्या नाहीत. परंतु यामुळे विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली नाही अशी माहिती त्यांनी दिली. लग्नाच्या ‘बुकिंग’ची अगोदरपासून प्रशासनाला माहिती नव्हती का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Web Title: Soy weddings, inconvenient students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.