सोयाबीन व फल्ली तेल महाग
By admin | Published: May 14, 2015 02:43 AM2015-05-14T02:43:27+5:302015-05-14T02:43:27+5:30
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे वाढलेले दर, डॉलरच्या तुलनेत रुपयाची होणारी घसरण आणि लग्नसराईत खाद्यतेलाच्या वाढत्या मागणीमुळे ..
ंनागपूर : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे वाढलेले दर, डॉलरच्या तुलनेत रुपयाची होणारी घसरण आणि लग्नसराईत खाद्यतेलाच्या वाढत्या मागणीमुळे स्थानिक बाजारपेठेत गेल्या काही दिवसांपासून वाढ होत आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. भाववाढीमुळे महागाईत पुन्हा भर पडली असून त्याचा फटका सामान्यांना बसला आहे.
प्रति किलो ५ ते ६ रुपयांची वाढ
गेल्या १५ दिवसांत सोयाबीन आणि फल्ली तेलाच्या किमती प्रति किलो ५ ते ६ रुपयांनी वधारल्या आहेत. किरकोळ बाजारात भाव ६६ वरून ७२ रुपयांवर गेले आहे. त्यात आणखी ५ ते ६ रुपये वाढीची शक्यता आहे. सोयाबीन डब्याचे (१५ किलो) भाव ११६५ ते ११८० रुपयांवर तर फल्ली तेलाचा डबा १५७० ते १६०० रुपयांवर पोहोचला आहे. किरकोळ बाजारात फल्ली तेल १०४ वरून ११० रुपयांवर गेले आहे. भाववाढीनंतरही बाजारात ग्राहकांची गर्दी आहे. मे आणि जून महिन्यात लग्नसराईमुळे मागणीत वाढ राहील, अशी प्रतिक्रिया इतवारी बाजारातील अनिल अॅण्ड संजय कंपनीचे संचालक अनिलकुमार अग्रवाल यांनी लोकमतशी बोलताना दिली.
रुपयांच्या घसरणीमुळे आयातीवर परिणाम
सोयाबीन आणि फल्ली तेलासह अन्य खाद्य तेलाच्या किमतीही वधारल्या आहेत. लग्नसराईत पाम तेलाला मागणी असते. याशिवाय मलेशिया येथून या तेलाची आयात करण्यात येते. रुपयांच्या घसरणीमुळे आयातीवर परिणाम झाला आहे. १० दिवसांआधी प्रति किलो ६२ रुपये असलेले पाम तेल ६८ रुपयांवर पोहोचले आहे. त्यात आणखी वाढ होईल.
तसेच उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल आणि राजस्थान सर्वाधिक विक्री होणाऱ्या सरसो तेलाच्या किमतीत तब्बल १० रुपयांची वाढ झाली असून भाव प्रति किलो ९० वरून १०० रुपयांवर पोहोचले आहेत. यंदा अतिवृष्टीचा पिकांना फटका बसल्याचे कारण सांगितले जात आहे. शिवाय सट्टा बाजारानेही भाववाढीला हातभार लावल्याचे अग्रवाल म्हणाले.
इतवारी तेल बाजारात राईस बॅ्रड तेलाची मागणी वाढली आहे. ११०० रुपये डबा आहे. १५ दिवसांत प्रति किलो भाव ७५ वरून ८० रुपयांवर गेले आहेत.
दरदिवशी भाववाढीमुळे ग्राहक त्रस्त आहेत. इतवारी बाजारात दररोज १२ ते १३ हजार डब्याची विक्री होते. त्यात ७ ते ८ हजार डबे सोयाबीन तेल विकले जाते. उर्वरित डब्यामध्ये अन्य तेलाचा समावेश आहे. जूनच्या अखेरपर्यंत खाद्य तेलाला मागणी राहील, असे अनिल अग्रवाल म्हणाले. (प्रतिनिधी)