सोयाबीन, कापसाला फुटले अंकुर :  नुकसानीचे पंचनामे करणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2019 09:11 PM2019-10-30T21:11:09+5:302019-10-30T21:14:06+5:30

शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास, परतीच्या पावसाने हिसकावून घेतला. पावसामुळे शेतात कापलेल्या सोयाबीनला अंकुर फुटले तर कापसाचे बोंड गळून पडले. पावसामुळे भिजलेले पीक शेतात पडून आहे.

Soyabean, cotton sprouted seeds: When will the panchanama of damaged? | सोयाबीन, कापसाला फुटले अंकुर :  नुकसानीचे पंचनामे करणार कधी?

सोयाबीन, कापसाला फुटले अंकुर :  नुकसानीचे पंचनामे करणार कधी?

googlenewsNext
ठळक मुद्देअधिकारी दिवाळीच्या सुट्यांवर

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास, परतीच्या पावसाने हिसकावून घेतला. पावसामुळे शेतात कापलेल्या सोयाबीनला अंकुर फुटले तर कापसाचे बोंड गळून पडले. पावसामुळे भिजलेले पीक शेतात पडून आहे. अधिकारी पंचनामे करतील, विमा कंपन्यांचे अधिकारी भेटी देतील, अशा अपेक्षेत शेतकरी आहे. मात्र दिवाळीच्या सुट्यात सर्व प्रशासन सुस्त आहे. अशात नुकसानीच्या पंचनाम्याची शेतकरी प्रतीक्षा करीत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. 


जिल्ह्यातील कापूस आणि सोयाबीनच्या पट्ट्यांमध्ये पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोयाबीनच्या शेंगातील दाणे, कापसाची सरकी पावसात भिजल्याने, कोंब फुटले आहे. अस्मानी संकटामुळे शेतमालाची पत प्रचंड खालावली आहे. यावर्षी निसर्गाने सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांची चेष्टा केली. हंगामाच्या सुरूवातीला पावसाने दडी मारली. मध्यंतरी संततधार पावसाने शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीस आला. त्यातच ढगाळ वातावरण व सूर्यप्रकाशाच्या कमतरतेमुळे पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम झाला. दमट वातावरणामुळे किडीचा प्रादुर्भाव झाला. पावसाने थोडीफार सवड देताच शेतकऱ्यांनी पिकांची आंतरमशागत करून कीटकनाशकाची फवारणी केली. त्यामुळे पिकांनी कसाबसा जोम धरला. दिवाळीच्या पूर्वी बहुतेक शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील सोयाबीनची कापणी करून शेतात गंजी लावून ठेवली. काही पीक अजूनही शेतातच आहे. काही शेतातील कापूस वेचणीला सुद्धा आला. परंतु परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना कापूस, सोयाबीन वाचविण्याची सवड मिळाली नाही. त्यामुळे शेतात असलेले अथवा कापून ठेवलेल पीक पावसात चिंब भिजले. त्याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. 

नुकसान भरपाई मिळावी अशी स्वाभाविकच अपेक्षा शेतकऱ्यांची आहे. अनेक शेतकऱ्यांनी नुकसान झालेली पीकं शेतातच ठेवली आहे. अधिकारी येतील पंचनामे करतील, अशा अपेक्षेत शेतकरी आहे. पण दिवाळीच्या सुट्यांमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षेवर पाणी फेरले आहे. बुधवारीही शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची गंभीरता कृषी विभागाच्या कार्यालयात दिसून आली नाही. कृषी विभागाचे म्हणणे आहे की, जिल्ह्यात फार पाऊस झाला नाही, त्यामुळे पिकांचे नुकसान झालेले नसावे.
 प्रशासन मुख्यमंत्र्यांच्या संगीत खुर्चीत व्यस्त
सध्या सरकारचं नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांना आदेश देणार तरी कोण?, संपुर्ण प्रशासन हे मुख्यमंत्र्याच्या संगीत खुर्चीत व्यस्त आहे. पगार घेणाºया अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचे नुकसान दिसत नाही. त्यातच अधिकाऱ्यांना दिवाळीच्या सुट्यासुद्धा आहे. विम्याचे हप्ते कापले, नुकसान झाल्यावर विमावाले ढुंकून सुद्धा बघत नाही. शेतकऱ्यांबद्दल प्रशासनाची ही लाचारीच म्हणावी लागेल.
राम नेवले, नेते, शेतकरी संघटना

Web Title: Soyabean, cotton sprouted seeds: When will the panchanama of damaged?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.