सोयाबीन तेल १२२, सूर्यफूल १४० रुपये किलो!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:08 AM2020-12-24T04:08:32+5:302020-12-24T04:08:32+5:30
नागपूर : देशात यंदा सोयाबीनचे पीक ३० टक्के आले आहे, शिवाय अर्जेटिना आणि ब्राझील देशातून सोयाबीन कच्च्या तेलाची आयात ...
नागपूर : देशात यंदा सोयाबीनचे पीक ३० टक्के आले आहे, शिवाय अर्जेटिना आणि ब्राझील देशातून सोयाबीन कच्च्या तेलाची आयात कमी झाल्याने देशांतर्गत स्थानिक बाजारपेठांमध्ये सर्वाधिक विकल्या जाणारे सोयाबीन तेल दोन महिन्यांपासून किरकोळमध्ये प्रति किलो २० ते २२ रुपयांनी वाढून १२२ रुपयांवर पोहोचले आहे. त्यामुळे स्वयंपाकघरातील तेलाची फोडणी महागली असून महागाईचा गरीब व सामान्यांना फटका बसला आहे. सर्वच तेलांच्या किमती २० ते २५ रुपये किलोने वाढल्या आहेत. किमती आणखी किती वाढतील, असे सांगणे कठीण असल्याचे किरकोळ विक्रेत्यांचे मत आहे.
का वाढले दर?
देशात कमी आलेले सोयाबीनचे पीक, आयात व निर्यातीत तफावत आणि जागतिक बाजारातून चीनकडून होणारी भरमसाठ खरेदी ही दरवाढीची मुख्य कारणे आहेत. देशात जवळपास ५० टक्के सोयाबीन कच्चे तेल अर्जेंटिना आणि ब्राझील या देशातून आयात होते. पण यंदा भारतासह अर्जेंटिनामध्ये पिकाला फटका बसला आहे. शिवाय चीन या देशांमधून सोयाबीनची मोठ्या प्रमाणात खरेदी करीत असल्याने भारतात आयात कमी झाली आहे. याशिवाय भारतात मलेशिया आणि इंडोनिशिया या देशातून पाम तेलाची आयात ८० टक्क्यांपेक्षा जास्त होते. भारतात केंद्र सरकारने पाम तेलावर १० टक्के आयात शुल्क कमी केले, पण मलेशियाने निर्यातीवर ८ टक्के निर्यात शुल्क वाढविल्याने देशात आयात महाग झाली आहे. त्याचा फटका पाम तेलाला बसल्याचे मत राणी सती एन्टरप्राईजेसचे संचालक अनिल अग्रवाल यांनी व्यक्त केले.
सोयाबीनमध्ये २२, सूर्यफूल तेलाची २५ रुपये दरवाढ
गेल्या दोन महिन्यात सोयाबीन तेलाचे दर प्रति किलो २२ रुपये तर सूर्यफूल तेल २५ रुपयांनी वाढले आहे. दुसरीकडे सोयाबीनला जास्त भाव मिळत नसताना तेलाचे भाव का वाढत आहेत, अशी ओरड सुरू आहे. यावर अनिल अग्रवाल म्हणाले, १०० किलो सोयाबीनपासून १७ ते २२ किलो तेल निघते आणि उर्वरित ढेप तयार होते. पण यंदा ढेपेला देशविदेशात मागणी नाही. त्यामुळे एक क्विंटल सोयाबीनला ४ हजारांच्या आसपास भाव मिळत आहेत. विदर्भात ८० टक्के सोयाबीन तेल विकले जाते. उर्वरित टक्केवारीत सर्व तेलांचा समावेश आहे. सोयाबीनचे दर वाढल्याने सर्वच क्षेत्रातून ओरड सुरू आहे. शिवाय दर नियंत्रणात आणा आणि साठेबाजांवर कारवाई करा, अशी मागणी ग्राहक संघटना करीत आहेत.
खाद्यतेल किलो दरवाढीचा तक्ता :
खाद्यतेल २३ ऑक्टो. २३ नोव्हें. २३ डिसें.
सोयाबीन १०० ११० १२२
सूर्यफूल ११० १२४ १४०
शेंगदाणा १५० १५४ १६०
पाम ९० १०५ ११५
माेहरी ११० १२४ १३०
राईस ९६ ११० १३०