कळमन्यात मुहूर्तावर सोयाबीन ४,२५१ रुपये क्विंटल; भाव घसरणीमुळे शेतकरी चिंतेत
By मोरेश्वर मानापुरे | Published: October 5, 2023 06:25 PM2023-10-05T18:25:54+5:302023-10-05T18:27:29+5:30
गेल्यावर्षी ५,३०० रुपये : जास्त भाव मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी
नागपूर : नागपुरातील कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान्य बाजारात सोयाबीनची आवक आणि विक्री सुरू झाली असून मुहूर्तावर सोयाबीनला ४,२५१ रुपये क्विंटल भाव मिळाला आहे. गेल्यावर्षीच्या ५,३०० रुपयांच्या तुलनेत भाव कमी मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. भाव जास्त मिळावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
धान्य बाजारात पहिल्यांदा सोयाबीन विक्रीसाठी आणणारे शेतकरी भगवान वंजारी यांचे स्वागत धान्य बाजाराचे अध्यक्ष सारंग वानखेडे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अतुल सेनाड यांनी केले. सोयाबीनची खरेदी राजन ट्रेडिंग कंपनी, बालाजी ट्रेडिंग कंपनी, अन्नपूर्णा ट्रेडिंग, वर्धमान ट्रेडर्स, निर्मल ट्रेडर्स यांनी केली, तर गोपाल कळमकर हे पहिले अडतिया ठरले. यावेळी पदाधिकारी रहेमान शेख, उदय आकरे, मनोहर हजारे, विनोद कातुरे, सुरेश बारई, स्वप्निल वैरागडे, राजेश सातपुते, गोविंद नागपुरे हजर होते.
एपीएमसीचे संचालक अतुल सेनाड म्हणाले, यावर्षी पावसामुळे सोयाबीन खराब झाल्याने मुहूर्तावर शेतकऱ्यांना भाव मिळाला नाही. यंदा किती सोयाबीन बाजारात विक्रीला येईल, हे सांगणे कठीण आहे. गेल्यावर्षी आणि त्याआधीच्या हंगामात शेतकऱ्यांना सोयाबीनला १० हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला होता. सोयाबीनचा दर्जा पाहूनच खरेदी-विक्री होईल.