सोयाबीनचे दर ५ हजारांपर्यंत उतरले; शेतकऱ्यांना दणका

By मोरेश्वर मानापुरे | Published: March 16, 2023 08:00 AM2023-03-16T08:00:00+5:302023-03-16T08:00:07+5:30

Nagpur News यंदा अवकाळी पावसामुळे सोयाबीन पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. उत्पादन कमी असून गेल्या काही वर्षांचा तुलनेत यंदा दर्जाही खालावला आहे. त्यामुळे सोयाबीनच्या पिकाला भाव मिळत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.

Soybean prices down to 5 thousand; A blow to the farmers | सोयाबीनचे दर ५ हजारांपर्यंत उतरले; शेतकऱ्यांना दणका

सोयाबीनचे दर ५ हजारांपर्यंत उतरले; शेतकऱ्यांना दणका

googlenewsNext

मोरेश्वर मानापुरे 

नागपूर : यंदा अवकाळी पावसामुळे सोयाबीन पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. उत्पादन कमी असून गेल्या काही वर्षांचा तुलनेत यंदा दर्जाही खालावला आहे. त्यामुळे सोयाबीनच्या पिकाला भाव मिळत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. बुधवारी कळमन्यात सोयाबीनचे प्रतिक्विंटल भाव ४७५० ते ५०५० रुपये आहेत. भाव उतरल्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला आहे.

सोयाबीनच्या मागणीत घट आणि दर उतरण्याचे मुख्य कारण म्हणजे देशविदेशात सोयाबीन ढेपला मागणी कमी झाली आहे. दोन वर्षांआधी जूनच्या अखेरीस सोयाबीनला ९९०० रुपयांपर्यंत भाव मिळाला होता. पण आता भाव अर्ध्यावर आल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दोन महिन्यांआधी भाव ६५०० रुपयांपर्यंत गेला होत. भाव आणखी वाढण्याच्या शक्यतेने शेतकऱ्यांनी मालाची विक्री थांबविली होती. पण आता भाव ५ हजारांपर्यंत उतरल्यामुळे शेतकऱ्यांचे संकट वाढले आहे. यासोबतच दोन महिन्यांआधी १४६ रुपये किलोवर असलेले सोयाबीन तेलाचे भाव बुधवारी १२५ रुपये किलोपर्यंत घसरले होते. एकंदरीत पाहता यंदा सोयाबीन दृष्टचक्रात सापडले आहे.

यंदा ब्राझील, अमेरिका (शिकागो) आणि अन्य देशांमध्ये सोयाबीनचे उत्पादन प्रचंड वाढले आहे. त्यामुळे या देशासह अन्य देशांमध्ये भारतातील सोयाबीन ढेपला मागणी कमीच आहे. नागपुरात भाव ३० ते ३४ रुपये किलो आहे. भाव कमी झाल्यानंतरही उठाव नाहीच. एक क्विंटल सोयाबीन क्रश केल्यानंतर १७ ते १८ किलो तेल आणि ६५ ते ६७ किलो ढेप निघते. ढेपला चांगले भाव मिळाल्यास बाजारात सोयाबीनला चांगले दर मिळतात, असे प्रमाण आहे. यंदा स्थिती उलट असल्यामुळे भाव घसरले आहेत.

कळमन्यातील धान्य बाजार अडतिया असोसिएशनचे पदाधिकारी कमलाकर घाटोळे म्हणाले, दररोज केवळ ७०० ते ८०० पोत्यांची आवक आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी सोयाबीन नाहीच. मोठे व्यापारी आणि शेतकऱ्यांनी सोयाबीन साठविला आहे. भाव वाढल्यानंतर ते विक्रीसाठी बाजारात आणतील. मार्चपर्यंत भाववाढीची काहीच शक्यता नाही. मार्चनंतर काय होते, हे आता सांगणे कठीण आहे. भाव उतरल्यामुळे शेतकऱ्यांना दणका बसला आहे, हे नक्की.

Web Title: Soybean prices down to 5 thousand; A blow to the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती