साेयाबीन बियाण्यांचे दर गगनाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:09 AM2021-05-18T04:09:03+5:302021-05-18T04:09:03+5:30

अभय लांजेवार लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : मागील वर्षी खरीप हंगामात वाढलेला उत्पादन खर्च, वेचणी करण्यासाठी मजुरांचा अभाव आणि ...

Soybean seed prices skyrocket | साेयाबीन बियाण्यांचे दर गगनाला

साेयाबीन बियाण्यांचे दर गगनाला

Next

अभय लांजेवार

लोकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : मागील वर्षी खरीप हंगामात वाढलेला उत्पादन खर्च, वेचणी करण्यासाठी मजुरांचा अभाव आणि निसर्गचक्रामुळे बसलेला फटका यामुळे कपाशीचे उत्पादन चांगलेच घटले. सोयाबीन पिकाचेही तेच हाल झाले. उतारीच मिळाली नाही. उत्पादनात कमालीची घट झाली. यामुळे यंदाच्या हंगामात सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शिवाय, सोयाबीन बियाण्यांचे दरसुद्धा गगनाला भिडणारेच राहील. आधीच आर्थिक घडी विस्कटलेल्या शेतकऱ्यांची अवस्था बी-बियाणे आणि खते, फवारणी औषधांच्या दरवाढीमुळे अत्यंत बिकट होणार आहे.

यंदा अखेरच्या काही दिवसांत सोयाबीनला आठ हजार रुपयांच्या आसपास प्रतिक्विंटल दर बाजारपेठेत मिळाला. यामुळे यावर्षी सोयाबीन बियाण्यांची ३० किलोंची बॅग ३,३०० रुपयांच्या जवळपास खरेदी करावी लागणार असल्याचा अंदाज आहे. मागील वर्षी अखेरीस बाजारपेठेत सोयाबीनला ४,५०० ते पाच हजार रुपये प्रतिक्विंटल दर होते. त्यावेळी ३० किलो बियाण्याची बॅग २००० ते २४०० रुपये होती. सोयाबीन बियाण्यांवर वर्षभरात अंदाजे हजार रुपयांची दरवाढ शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारीच ठरत आहे. कृषी केंद्रातून ज्या तारखेला बियाणे खरेदी केले असेल त्या तारखेपासून सात दिवसांच्या आत बियाण्यांची उगवणशक्ती तपासणीचेही काम शेतकऱ्यांना काळजीपूर्वक करावे लागणार आहे.

....

सोयाबीनचा पेरा वाढणार

उमरेड तालुक्यात मागील वर्षी खरिपाचे एकूण क्षेत्र ४३,३५७ हेक्टर होते. यामध्ये सोयाबीन १६,०४६, कपाशी २२,१७२, तर केवळ १,६८३ हेक्टरमध्ये धानाचे क्षेत्र होते. यावर्षी तालुक्यात खरिपाचे क्षेत्र ४५,५६५ हेक्टर असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे यांनी दिली. सोयाबीन १६,५०० हेक्टर, कपाशी २२,५००, धान रोवणी १,८०० हेक्टर आणि तुरीचे क्षेत्र ३,२०० हेक्टरच्या जवळपास राहील. मागील वर्षी कापूस उत्पादकांचे हाल झालेत. यामुळे सोयाबीनचा पेरा थोडाफार वाढेल, असा अंदाज वर्तविला जात आहे.

.....

अशी घ्या खबरदारी

सोयाबीन बियाणे वाहतूक करताना बियाण्याच्या बॅगवर खताची पाेती वा इतर वजनदार वस्तू ठेवू नका. शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या बियाण्यांच्या कंपनीचे नाव, लॉट क्रमांक बिलाप्रमाणे बॅगवर तपासून घ्यावे. सोयाबीन बियाण्याची पेरणी करण्यापूर्वीच १००-१५० बिया घेऊन प्रथम उगवणशक्ती ७० टक्के जास्त असल्यानंतरच पेरणी करावी व उगवणशक्ती कमी असल्यास पेरणी करू नये. खरेदी बिलाच्या तारखेपासून सात दिवसांच्या आत ही तपासणी करावी, असे आवाहन महाराष्ट्र फर्टिलायझर असोसिएशनने केले आहे. पेरणीपूर्वी बुरशीनाशक व जीवाणूसंवर्धकाची बीजप्रक्रिया आवश्य करावी. १०० ते १२५ मि.मी. पाऊस पडल्यानंतरच व जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असल्यावरच पेरणी करावी.

....

बियाणे खरेदी केल्यानंतर लगेच बियाण्याची उगवणशक्ती तपासून घेतल्याने शेतकऱ्यांसह, दुकानदारांसाठी साेईचे होईल. कुणाचीही फसगत होणार नाही. बियाणे अयोग्य असल्यास कंपनी लागलीच बियाणे बदलवून देणार आहे.

- अतुल पलांदूरकर, कृषी केंद्र संचालक, उमरेड.

Web Title: Soybean seed prices skyrocket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.