आता सोयाबीनवरही आला ‘व्हायरस’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 08:22 PM2020-08-24T20:22:30+5:302020-08-24T20:24:45+5:30
कधी पाऊस चांगला होतो, तर कधी दुष्काळी स्थिती. या दोन्हीमध्ये शेतीवरील संकट काही कमी होताना दिसत नाही. यंदा चांगले पीक येईल, असा अंदाज होता. पण त्यावर पाणी फेरणार असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यातील काही भागामध्ये सोयाबीन पिकावर ‘यलो मोझॅक व्हायरस’चा प्रादुर्भाव वाढला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कधी पाऊस चांगला होतो, तर कधी दुष्काळी स्थिती. या दोन्हीमध्ये शेतीवरील संकट काही कमी होताना दिसत नाही. यंदा चांगले पीक येईल, असा अंदाज होता. पण त्यावर पाणी फेरणार असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यातील काही भागामध्ये सोयाबीन पिकावर ‘यलो मोझॅक व्हायरस’चा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे पाने पिवळी पडत आहेत.
कृषी विभागाकडून यंदा जिल्ह्यासाठी खरीपाचे ५ लाख १०० हेक्टरवर नियोजन करण्यात आले होते. त्यात सोयाबीनचे नियोजित क्षेत्र ८५ हजार हेक्टर इतके होते. परंतु शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीनला प्राधान्य दिले. त्यामुळे आजपर्यंत १ लाख २ हजार हेक्टरवर आतापर्यंत सोयाबीनची पेरणी झाली आहे. पण सततच्या पावसामुळे जमिनीला ओल आल्याने झाडाच्या मुळाशी अन्न शोषण करण्याची प्रक्रिया मंदावली आहे. येलो मोझॅक व्हायरसने सोयाबीनची पाने पिवळी पडत आहेत. कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्रज्ञ डॉ. हरीश सवई व वनस्पती रोग शास्त्र विभागाचे डॉ. मोहन पाटील यांच्या पथकाने जिल्ह्यातील काही शेतीची पाहणी केली. सोयाबीनवर येलो मोझॅक व्हायरसबरोबरच खोडमाशी आणि चक्रीभूंगा किडीचा प्रादूर्भाव दिसून आला.
या सांगितल्या उपाययोजना
शेतात पाणी साचून असल्यामुळे झाडांच्या मुळाद्वारे अन्न शोषण करण्याची प्रक्रिया मंदावली आहे. जमिनीत पुरेशी हवा नसल्याने झाडावरील पाने पिवळी पडत आहेत. त्यासाठी पाण्याचा निचरा योग्य प्रकारे करणे, चर काढणे आदी उपाययोजना आहेत. तसेच किडीच्या प्रादुर्भावामुळे झाडांची पाने, फुले, शेंगा गळत आहेत. थोड्या प्रमाणात मुळसड रोगाचा प्रादूर्भाव असून, पानावर २-३ टक्के प्रमाणात बुरशीमुळे ठिपके पडलेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी १० ग्रॅम कार्बेन्डाझीम किंवा २५ ग्राम कॉपर ऑक्सिक्लोरायईची फवारणी करण्याचा सल्ला दिला आहे.