अभियांत्रिकी महाविद्यालयांतील जागा घटल्या, प्रवेशाचा टक्का वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2020 10:52 AM2020-08-06T10:52:46+5:302020-08-06T10:53:09+5:30
यंदा जागा घटल्याने प्रवेशाचा टक्का वाढण्याची शक्यता असल्याचे अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत. २०१४ सालापासून ६ वर्षांत राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांतील ३५ हजारांहून अधिक जागा कमी झाल्या आहेत हे विशेष.
योगेश पांडे
नागपूर : अभियांत्रिकीच्या प्रवेशप्रक्रियेला अद्याप सुरुवात झालेली नसली तरी महाविद्यालयांकडून तयारी करण्यात आली आहे. महाविद्यालयांपुढे कोरोनामुळे मोठे आव्हान उभे ठाकले असले तरी यंदा जागा घटल्याने प्रवेशाचा टक्का वाढण्याची शक्यता असल्याचे अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत. २०१४ सालापासून ६ वर्षांत राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांतील ३५ हजारांहून अधिक जागा कमी झाल्या आहेत हे विशेष.
२०१४-१५ पासूनच्या आकडेवारीवर नजर टाकली असता प्रवेश क्षमतेत घट झाल्याचे दिसून येत आहे. २०१४-१५ साली राज्यभरातील शासकीय, खासगी महाविद्यालयात मिळून १ लाख ७० हजार ५ इतक्या जागा होत्या. त्यानंतर सातत्याने जागांमध्ये घट होत गेली. विविध कारणांमुळे महाविद्यालयांतील तुकड्या किंवा शाखा कमी होत गेल्या. २०१८-१९ साली जागांचा आकडा १ लाख ४४ हजारांवर आला तर २०२०-२१ मध्ये १ लाख ३४ हजार ७७६ जागाच प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. सहा वर्षांतील टक्केवारी काढली तर राज्यभरात २०.७२ टक्के जागा घटल्या. मात्र यंदा कोरोनामुळे विद्यार्थ्यांचा भर हा राज्यातीलच महाविद्यालयांत प्रवेशावर राहणार आहे. एकीकडे जागांचे प्रमाण कमी झाले असताना या स्थितीमुळे रिक्त जागांचे प्रमाणदेखील घटण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.
- प्लेसमेंट वाढल्याचा फायदा होणार
२०१४-१५ साली राज्यात ३८० महाविद्यालये होती. यंदाच्या शैक्षणिक सत्रात ३५४ महाविद्यालयांत प्रवेशप्रक्रिया राबवली जाणार आहे. प्लेसमेंटचे प्रमाण काहिसे घटल्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या रोडावली होती व त्यामुळे काही महाविद्यालये बंद झाली. मात्र प्लेसमेंट वाढत असल्यामुळे विद्यार्थी परत अभियांत्रिकीकडे वळण्याची चिन्हे असून यंदा स्थिती बदललेली दिसेल असे मत तंत्रशिक्षण संचालनालयाचे विभागीय प्रभारी सहसंचालक डॉ. राम निबुदे यांनी व्यक्त केले,
- १ लाख ३४ हजार जागांसाठी प्रवेश
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या आकडेवारीनुसार २०१९-२० मध्ये राज्यात अभियांत्रिकीच्या १ लाख ३५ हजार ३१२ जागा होत्या. २०१०-२१ मध्ये यात घट झाली असून यंदा १ लाख ३४ हजार ७७६ जागांसाठी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.