नागपूर ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’मध्ये पहा स्पॅनिश तरुणीचे कथ्थक आणि सिल्व्हर स्ट्रिंगची धम्माल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 10:33 AM2017-12-15T10:33:05+5:302017-12-15T10:35:00+5:30
आॅनलाईन लोकमत
नागपूर:
नीरा सुआरेझ ही आहे तशी स्पेनची. परंतु भारतीय नृत्याच्या प्रेमात पडली अन् आज कथ्थक, ओडिसी आणि बॉलिवूडची प्रसिद्ध नृत्यांगना अशी तिची ओळख बनली आहे. स्पेनमधल्या बार्सिलोना येथेही ती कथ्थक शिकवते. अशी ही प्रतिभावंत नृत्यांगना ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’मध्ये आपल्या पदलालित्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार आहे. २००९ मध्ये ती प्रथमच भारतात आली. भारतीय संस्कृतीचे विविधांगी कंगोरे बघून भारावून गेली. दोन वर्षे वाराणशीत राहिली. तिथे प्रसाद मिश्रांकडे नृत्याचे धडे घेतले. पुढे कालिनाथ मिश्रा, रेमो डिसोझा, गणेश आचार्य यांच्यासोबतही नीराने काम केले आहे. सिल्व्हर स्ट्रींग हा भारतातील सर्वात लोकप्रिय असा आंतरराष्ट्रीय मुलींचा बँड आहे. या बँडने आतापर्यंत ६०० वर यशस्वी कार्यक्रम सादर केले आहेत. गायन आणि वाद्यांचा हा आश्चर्यकारक, भव्य आणि अफलातून कार्यक्रम आहे. नागपुरात अशाप्रकारचा शो पहिल्यांदाच होत असल्याने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. १८ डिसेंबर रोजी मानकापुरातील विभागीय क्रीडा संकुलात या शोचा दणदणाट अनुभवता येणार आहे.
शताबी बासू उलगडणार फ्रूट ज्यूसचे विश्व
भारतातील पहिली मिक्सोलॉजिस्ट शताबी बासू १८ डिसेंबर रोजी आपला या क्षेत्रातील प्रवास उलगडणार आहे. पुरुषांचे प्राबल्य असलेल्या या क्षेत्रात तिने कसे पहिल्यांदा पाऊल ठेवले, स्वत:ला सिद्ध करण्यासाठी तिला कसा संघर्ष करावा लागला आणि आता तिने स्वत:ची कशी वेगळी ओळख निर्माण केली आहे, हे ती सांगणार असून यासोबतच फ्रूट ज्यूसच्या क्षेत्राबाबत मार्गदर्शनही करणार आहे.