विद्युत अभियंत्याच्या स्पार्कने अक्षरांचे झाले मोतीहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:11 AM2021-09-06T04:11:53+5:302021-09-06T04:11:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोराडी येथील औष्णिक विद्युत केंद्रात कनिष्ठ अभियंता पदावर कार्यरत असलेले मौदा येथील लक्ष्मण नागो ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोराडी येथील औष्णिक विद्युत केंद्रात कनिष्ठ अभियंता पदावर कार्यरत असलेले मौदा येथील लक्ष्मण नागो बावनकुळे यांच्या अक्षरलेण्यांची नोंद जगाने घेतली आहे. अभियंता असल्यामुळे मुळातच वृत्तीत चिकाटी, त्यात अभिव्यक्त होण्याची संवेदनशीलता आणि लहरी मनावर मिळवलेला ताबा, त्यांच्यातील कलासक्तीला नवा आयाम देत गेला. या सगळ्या स्पार्क मधून त्यांनी अक्षरांना मोत्यांचे स्वरूप दिले आहे.
वय वर्ष ३३, आई-वडील ३ वर्षाचे असतानाच वारले, सोबतीला मोठे बहीण-भाऊ असे लक्ष्मण बावनकुळे यांना अक्षरांचा व्यासंग अगदी शालेय जीवनापासूनच लागला. प्रत्येकाच्या हाती मोबाईल अन् लिखाणासाठी संगणाचे की-बोर्ड असणाऱ्या काळात हाताने लिहिणे म्हणजे भारी कसरतीचे काम. त्यात सुंदर, वळणदार लिहिणे म्हणजे दिव्यच. ही किमया साधत लक्ष्मण बावनकुळे यांनी सातासमुद्रापार आपल्या मोत्यांसारख्या हस्ताक्षरांचा झेंडा फडकावला आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील अल्बानी येथे पार पडलेल्या ऑनलाईन वर्ल्ड हॅण्डरायटिंग कॉन्टेस्ट २०१९-२१ मध्ये त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. यापूर्वीही त्यांनी अमेरिकेतीलच मिशेल आर्च हुलजे या नामांकित हस्ताक्षर तज्ज्ञाने घेतलेल्या स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावला होता. शिवाय, भारतात पार पडलेल्या विविध स्पर्धांमध्येही लक्ष्मण रेषांची वाहवा झालेली आहे.
-----------
ही स्पर्धा मोनो, कर्स्यू आणि आर्टिस्टिक प्रकारात होती. यात मी आर्टिस्टिक प्रकारात सहभाग घेतला. अक्षरांचा आकार, रिदम, स्पेस, मार्जिन आणि अन्य निकषांवर आधारित या स्पर्धेत मी बाजी मारली आहे. हे माझ्या अक्षरसाधनेचे बक्षीसच आहे. सध्या मी काही फॉण्ट्स तयार करतो आहे. हे फाॅण्ट्स मायक्रोसॉफ्टच्या यादीत समाविष्ट करणे, हे माझे ध्येय आहे.
- लक्ष्मण बावनकुळे, अक्षरसाधक व कनिष्ठ अभियंता, कोराडी औष्णिक विद्युत केंद्र
...............