सत्ताधारी सदस्यांकडूनच सभापती टार्गेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:07 AM2021-06-03T04:07:14+5:302021-06-03T04:07:14+5:30
नागपूर : समग्र शिक्षा अभियानातून विद्यार्थ्यांना वितरित आलेल्या गणवेशावरून शिक्षण समितीतील राजकारण संपण्याचे नाव घेताना दिसत नाही. समितीतील सत्ताधारी ...
नागपूर : समग्र शिक्षा अभियानातून विद्यार्थ्यांना वितरित आलेल्या गणवेशावरून शिक्षण समितीतील राजकारण संपण्याचे नाव घेताना दिसत नाही. समितीतील सत्ताधारी सदस्यच आता सभापतींना टार्गेट करीत गणवेशावरून चौकशीचा आग्रह धरीत आहेत. दुसरीकडे तक्रारीच नाही तर चौकशी कशाची, असा सूर सभापतींकडून आवळला जातोय.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची बुधवारी सभापती भारती पाटील यांच्या अध्यक्षतेत ऑनलाइन बैठक झाली. बैठकीत विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या गणवेशाच्या दर्जावरून युक्तीवाद झाले. यात सत्ता पक्षाचे सदस्यच सभापतींच्या विरोधात असल्याचे चित्र बैठकीत दिसून आले. समग्र शिक्षा अभियान अंतर्गत यावर्षी विद्यार्थ्यांना एकच गणवेश देण्यात आला. गणवेशाच्या खरेदीचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला देण्यात आले. गणवेशाच्या दर्जाबाबत समितीच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त करीत, रामटेक तालुक्यात निकृष्ट दर्जाचे गणवेश खरेदी करण्यात आल्याची ओरड केली. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. सदस्यांच्या आग्रहामुळे स्थानिक गटशिक्षणाधिकारी जि.प. सदस्याला सोबत घेऊन चौकशी करणार असल्याचे सभापतींनी सांगितले. सदस्यांची तक्रार असल्यामुळे चौकशी करण्याचा आदेश दिला; पण कुठल्याही तालुक्यातील पालकांकडून शिक्षण विभागाकडे गणवेशाची तक्रार आलेली नाही, असेही सभापतींनी सांगितले. समिती सदस्य दुधराम सव्वालाखे व प्रकाश खापरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेतली. या प्रकरणाच्या चौकशीची मागणी त्यांनी केली.
- विशेष शिक्षिकेला मदतीचा हात
पारशिवनी तालुक्यातील चंदा बेझलवार या विशेष शिक्षिकेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. परिस्थिती हलाकीची असल्याने गटशिक्षणाधिकारी लोखंडे यांनी मदतीचे आवाहन करताच शिक्षकांनी २ लाख ८७ हजार रुपये गोळा केले. सभापतींच्या हस्ते त्यांच्या कुटुंबीयांना निधी देण्यात आला.