वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे गुन्हाच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 08:02 PM2018-05-18T20:02:07+5:302018-05-18T20:02:21+5:30
वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे बेकायदेशीर नसल्याचे केरळ उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे, मात्र महाराष्ट्र मोटार वाहन कायदा १९८९ मधील ‘२५० अ’ कलमानुसार तो गुन्हा ठरतो. याच कलमाखाली प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहरने वर्षभरात ६० तर गेल्या चार महिन्यात वाहतूक शाखा चेंबर २ अंतर्गत ४३३ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे बेकायदेशीर नसल्याचे केरळ उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे, मात्र महाराष्ट्र मोटार वाहन कायदा १९८९ मधील ‘२५० अ’ कलमानुसार तो गुन्हा ठरतो. याच कलमाखाली प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहरने वर्षभरात ६० तर गेल्या चार महिन्यात वाहतूक शाखा चेंबर २ अंतर्गत ४३३ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे.
जोपर्यंत वाहन चालविताना लोकांची सुरक्षा धोक्यात येत नाही, तोपर्यंत त्याला बेकायदेशीर म्हणता येणार नाही. वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे लोकांसाठी आणि सार्वजनिक संपत्तीसाठी धोक्याचे आहे, असे म्हणू शकत नाही. कोणताही कायदा असे करण्यापासून रोखत नाही, असा निष्कर्षही केरळ उच्च न्यायालयाने मांडला आहे. परंतु तज्ज्ञाच्या मते केरळमध्ये त्या कायद्यात तसे नियम केले नसावे. महाराष्ट्र मोटार वाहन कायद्यात तशी तरतूद असल्याने तो गुन्हाच ठरतो.
असा आहे कायदा
‘आरटीओ’ने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, वाहन चालविताना लक्ष विचलित होऊन अपघात होण्याची शक्यता लक्षात घेता मोबाईलच नव्हे, तर वायर अथवा वायरलेस मोबाईलचा वापर करता येत नाही. सिग्नलवर, तसेच रस्त्याच्या कडेला थांबले असतानाही त्याचा वापर करता येत नाही. वाहनावरून उतरून ते रस्त्याच्या कडेला नेऊन नीट उभे करा. उतरा आणि मगच मोबाईल वापरा, असे कायदा सांगतो.
२०० रुपये दंड
वाहन चालविताना किंवा वाहनावर बसून मोबाईलचा वापर वाढल्याने यावर गंभीर कारवाई केली जात आहे. नियमानुसार २०० रुपये दंड आकारला जातो. मोबाईलचा वापर, तसेच हेल्मेट नसणे, कागदपत्रे नसणे, विमा नसणे, परवाना नसणे, परवाना न बाळगणे, अयोग्य पार्किंग आदींसह मोटार वाहन कायद्यानुसार वाहतूक नियमांचे उल्लंघन आढळल्यास दंडाच्या रकमेत वाढ होते. मोटार वाहन कायद्याचे तीन वेळा उल्लंघन केल्यास आर्थिक दंडाबरोबरच परवाना निलंबन करण्याची शिफारस प्रादेशिक परिवहन खात्याला केली जाते.
आरटीओकडून ३० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई
आरटीओ नागपूर शहरने मार्च १७ ते एप्रिल १८ या कालावधीत ६० वाहनचालकांवर कारवाई करून ३० हजार रुपयांची दंडात्मक वसुली केली आहे. तर वाहतूक शाखा चेंबर २ अंतर्गत जानेवारी ते मार्च २०१८ या कालावधीत ४३३ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे.