विदर्भातील उद्योगांना चालना देण्यासाठी विशेष कृती दल
By जितेंद्र ढवळे | Published: April 1, 2024 02:24 PM2024-04-01T14:24:28+5:302024-04-01T14:24:44+5:30
एआयडी आणि कॅरेट कॅपिटलच्या बैठकीत निर्णय
नागपूर : विदर्भातील मध्यम आकाराच्या उद्योगांमध्ये नावीन्यपूर्णतेला चालना देण्यासाठी समर्पित विशेष कृती दलाची स्थापना करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. कॅरेट कॅपिटल आणि असोसिएशन फॉर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट (एआयडी) च्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीवर यावर चर्चा झाली.
बैठकीला कॅरेट कॅपिटलचे भागीदार प्राजक्त राऊत, पंकज बन्सल तसेच, एआयडीचे अध्यक्ष आशिष काळे, सचिव डॉ. विजयकुमार शर्मा, उपाध्यक्ष गिरधारी मंत्री व प्रणव शर्मा, बेबी व्हर्सचे संस्थापक शशिकांत चौधरी, राजेश रोकडे, पंकज भोकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
नुकत्याच पार पडलेल्या ‘ ॲडव्हान्टेज विदर्भ’मध्ये असोसिएशन फॉर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट (एआयडी)ने कॅरेट कॅपिटलसोबत धोरणात्मक आघाडी करून सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली हेाती. यात विदर्भाला समृद्धीकडे नेण्यासाठी उद्योजकता आणि नाविन्यपूर्णतेच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भर देण्यात आला होता.