पीक विमा योजनेसाठी विशेष मोहीम!
By admin | Published: July 30, 2014 01:18 AM2014-07-30T01:18:42+5:302014-07-30T01:18:42+5:30
राष्ट्रीय पीक विमा योजना अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी नागपूर व रामटेक उपविभागीय कार्यालयाच्यातर्फे विशेष मोहीम राबविली जात आहे.
शेवटचे दोन दिवस : ३१ जुलै रोजी मुदत संपणार
नागपूर : राष्ट्रीय पीक विमा योजना अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी नागपूर व रामटेक उपविभागीय कार्यालयाच्यातर्फे विशेष मोहीम राबविली जात आहे.
यात कृषी विभागाचे स्थानिक अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संपर्क साधून, त्यांना योजनेचे महत्त्व पटवून दिले जात आहे. तसेच गावागावातील ग्रामपंचायत कार्यालयात योजनेचे पोस्टर लावून, योजनेचा युद्धपातळीवर प्रचार-प्रसार केला जात आहे. यामुळे या योजनेला शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून, गत आठवडाभरात शेकडो शेतकऱ्यांनी पीक विमा काढून, योजनेचा लाभ घेतला आहे.
विशेष म्हणजे, या योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ जुलै ही अंतिम मुदत असून, त्याला आता केवळ दोन दिवस शिल्लक राहिले आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत नागपूर व रामटेक उपविभागातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी पीक विमा काढून योजनेचा लाभ घ्यावा, असे उपविभागीय कृषी अधिकारी विजय निमजे यांनी सर्व शेतकऱ्यांना आवाहन केले आहे.
दुष्काळ, पूर, भूस्खलन, चक्रीवादळ व गारपिट अशा नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण कवच प्रदान करून, त्यांना नुकसानभरपाई मिळावी, हा या योजनेमागील मुख्य उद्देश आहे. ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार अशा दोन्ही शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे.
यात शेतकऱ्यांना सोयाबीन, कापूस, भात, ज्वारी, उडीद, मुग, तूर व भूईमुग अशा कोणत्याही पिकांचा विमा काढता येतो. यामध्ये शेतकऱ्यांना आपल्या (सरासरी) उत्पादनांच्या १५० टक्क्यांपर्यंत विमा काढता येणार आहे.(प्रतिनिधी)
नुकसानाची ४८ तासात माहिती कळवा
विशेष म्हणजे, या योजनेत शेतकऱ्यांना फारच कमी विमा हप्ता भरायचा असून, एकूण विमा हप्त्यापैकी अर्धी रक्कम राज्य व केंद्र सरकारतर्फे जमा केली जाणार आहे. मात्र योजनेत सहभागी झालेल्या विमाधारक शेतकऱ्यांच्या पिकांचे कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास, त्याची संबंधित बँक किंवा भारतीय कृषी विमा कंपनीला ४८ तासात माहिती देणे अनिवार्य आहे. त्यामुळे भविष्यात कोणत्याही विमाधारक शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाल्यास, शेतकऱ्यांनी त्याची तत्काळ संबंधित बँकेला माहिती द्यावी, असेही उपविभागीय कृषी अधिकारी विजय निमजे यांनी आवाहन केले आहे.