२५ मेपासून शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी विशेष मोहीम
By admin | Published: May 21, 2017 06:44 PM2017-05-21T18:44:22+5:302017-05-21T18:44:22+5:30
शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी केंद्र सरकारच्या विविध कृषी योजनांचे विशेष अभियान ‘उन्नत शेती, समृद्ध शेतकरी मोहीम’ २५ मेपासून संपूर्ण राज्यात सुरू करण्यात येत आहे.
मिलिंद कीर्ती
चंद्रपूर : शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी केंद्र सरकारच्या विविध कृषी योजनांचे विशेष अभियान ‘उन्नत शेती, समृद्ध शेतकरी मोहीम’ २५ मेपासून संपूर्ण राज्यात सुरू करण्यात येत आहे. त्यामध्ये तालुका घटक ठरवून पीक प्रात्यक्षिक घेण्यात येणार आहे. यात शास्त्रीय पद्धतीने शेती करण्यासाठी सोयाबीन, धान, कापूस आणि तूर आदी पिकांचे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना, राष्ट्रीय गळीत धान्य आणि तेलताड अभियानाअंतर्गत प्रात्यक्षिक घेतले जाईल.
या मोहिमेत प्रत्येक तालुक्यात एका कृषी सहायकाच्या अधिनस्त १० हेक्टर क्षेत्राची निवड करण्यात येणार आहे. गावात स्वेच्छेने पीक प्रात्यक्षिक घेण्याची इच्छा असलेल्या शेतकऱ्यांचे अर्ज स्वीकारून त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांकडे कृषी विभागाने माती व हवामान पाहून पीक प्रात्यक्षिक घ्यायचे ठरविले आहे. त्याकरिता या शेतकऱ्यांनी शास्त्रीय पद्धतीने पीक लागवडीसाठी बियाणे दिले जाईल.
या मोहीमे सहभागी शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठाच्या शिफारशींप्रमाणे लागवड तंत्रज्ञान उपयोगात आणावे लागेल. कृषी विभागाचे कृषी सहायक किंवा कृषी विज्ञान केंद्रांचे तज्ज्ञ वेळोवेळी मार्गदर्शन करतील. खताची मात्रा व पीक संरक्षण औषधीच्या मात्रा मार्गदर्शक सूचनेप्रमाणे पिकांना द्याव्या लागतील. शेतकरी कृषी विद्यापीठाच्या शिफारसींप्रमाणे खताचा वापर करीत नाही. उन्नत शेती, समृद्ध शेतकरी मोहिमेत सेंद्रीय खताच्या वापरावर भर देण्यात आला आहे. ज्यांना ‘नीम’ कोटेड खत वापरणे आर्थिक दृष्ट्या परवडत नाही, त्यांना गांडूळ खत, बायोेडायनॉमिक डेपो आदीचा उपयोग करण्याचा सल्ला देण्यात येणार आहे. या मोहिमेतून पीक कर्जापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.